शासकीय योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी 'संवाद वारी' हा उपक्रम महत्त्वाचा
-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
*संवाद वारी सारख्या उपक्रमातून मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेची
प्रचार प्रसिद्धीही मोठ्या प्रमाणावर होत आहे
*माहिती व जनसंपर्क विभाग शासकीय योजनांच्या प्रचार प्रसिद्धीचे काम चांगले करत आहे
सोलापूर, दिनांक 16 (जिमाका)- माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने शासकीय योजनांच्या प्रचार प्रसिद्धीसाठी 'संवाद वारी' हा उपक्रम राबवला जात आहे. या माध्यमातून राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ही प्रचार प्रसिद्धी चांगल्या प्रकारे होत आहे. शासनाच्या विविध योजना तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संवाद वारी सारखे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे आयोजित 'संवाद वारी' या शासकीय योजनेच्या प्रदर्शन स्टॉलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन योजनांची प्रसिद्धी कशा पद्धतीने केली जात आहे याची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संवाद वारी हा उपक्रम पुणे येथून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी व जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पालखी यांच्या समवेत शासकीय योजनांची प्रसिद्धी करत इथपर्यंत आलेला आहे. त्यामुळे या पालख्या समवेतच्या प्रवासातील विसावा व मुक्कामाचे ठिकाणी व पालखी मार्गात येणाऱ्या विविध गावातील नागरिकापर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यास मदत झालेली आहे. माझी लाडकी बहीण योजना ही अशा प्रसिद्धीमुळेच तळागाळापर्यंत पोहोचत आहे. माहिती विभागाचे प्रचार प्रसिद्धीचे कामही चांगले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माहिती उपसंचालक श्री पाटोदकर यांनी माहिती विभागाच्या संवादवारी या उपक्रमाची सविस्तर माहिती मुख्यमंत्री महोदयांना दिली तसेच या प्रदर्शन स्टॉलमध्ये लावण्यात आलेल्या विविध योजनांविषयी माहिती दिली. माहिती विभागामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रसिद्धीही चांगल्या प्रकारे केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद वारी उपक्रमातील विविध योजनांची पाहणी केली व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्व दूर पोहोचवून एकही पात्र बहिण या योजनेपासून वंचित राहणार नाही याबाबत योग्य नियोजन करावे, असेही त्यांनी सूचित केले.
**""