विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद केल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त
*दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्या वर प्रशासनाकडून कारवाई करण्याचे आदेश जारी
सोलापूर, दिनांक 13(जिमाका):-श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन प्रशासनाने बंद केल्याने तासनतास विठ्ठल दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या हजारो भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सर्वसामान्य भाविक वारकरी यांच्यासाठी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन सेवा 24 तास उपलब्ध केली असल्यानेही भाविक अत्यंतिक समाधानी झालेले आहेत.
मागील काही दिवसापासून पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून व्हीआयपी दर्शना बाबत नाराजी व्यक्त केली जात होती. सर्वसामान्य भाविक 10 ते 30 तासापर्यंत दर्शन रांगेत उभा राहून श्री विठ्ठलाचे दर्शन घेत होता, परंतु व्हीआयपी दर्शनामुळे हा सर्वसामान्य भावीक नाराज झालेला होता. जिल्हा प्रशासन व मंदिर प्रशासनाने भाविकांच्या या नाराजीची दखल घेऊन सर्व प्रकारचे व्हीआयपी दर्शन बंद केलेले आहे. त्यामुळे दर्शन रांगेतील सर्वसामान्य भाविकांना दर्शन घेण्यास कमी कालावधी लागत आहे. तसेच प्रशासनाने विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाची सेवा 24 तास उपलब्ध करून दिली असल्याने सर्वसामान्य भाविक अत्यंत समाधानी झालेला आहे.
*भाविकांच्या प्रतिक्रिया-
1. श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांना खूप वेळ दर्शन रांगेत थांबावे लागते. परंतु काही लोकांना व्हीआयपी दर्शन मिळत असल्याने आम्हाला वाईट वाटत होते. परंतु प्रशासनाने ही व्हीआयपी दर्शनाची पद्धत बंद केली असल्याने आम्हाला दर्शनाला कमी वेळ लागत असून एक प्रकारचे समाधानही मिळत आहे. प्रशासनाने पंढरपूर शहरात दिलेल्या सोयी सुविधा बद्दलही समाधान आहे.
भाविक -श्रीकांत कदम, सांगली.
2. विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन प्रशासनाने बंद केल्यामुळे सर्वसामान्य भाविकांना आनंद झालेला आहे आमचेही खूप लवकर दर्शन झाले आम्ही मुंबईवरून विठू माऊलीच्या दर्शनासाठी आलेलो आहे. आमचे दर्शन खूप छान झाले व दर्शन रांगेतील सुविधाही खूप चांगल्या होत्या. 24 तास दर्शनाची व्यवस्था केल्याबद्दल ही प्रशासनाचे आभार!
भाविक - आकाश भंगे, मुंबई.
***