स्वेरीत महात्मा फुले यांची १९७ वी जयंती साजरी
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये थोर समाज सुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रेरक आणि जनक महात्मा जोतिराव फुले यांच्या १९७ वी जयंती साजरी करण्यात आली.
संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार यांच्या सहकार्याने सुरवातीला अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.के.बी. पाटील यांच्या हस्ते महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी महात्मा जोतीराव फुले यांचा जीवनपट उलगडून दाखवताना सांगितले की, ‘थोर समाजसुधारक महात्मा फुले यांचे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात अनमोल योगदान असून त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यातून सर्वांना स्फूर्ती मिळते. महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, समाजसुधारक आणि लेखक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन तसेच स्त्रियांना व समाजातील मागास घटकांना शिक्षण देण्याचे महान कार्य त्यांनी अखंडपणे कार्य केले. तत्कालीन समाजातील जातिभेद, अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील प्रस्थापितांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली दिसून येते. त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरतात. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी आहे. त्यांच्या सामाजिक योगदानामुळेच आज समाजात स्त्री व पुरुष खांद्याला खांदा लावून कार्य करत आहेत.’ असे सांगून त्यांनी म.फुले यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगितले. यावेळी शिक्षक डी.एन, डुचाळ, ओंकार मोहीकर, वाय.डी.जाधव, आदित्य अलट, व्ही.एम.चव्हाण तसेच स्वेरीचे डॉ.एच.बी.रोंगे, प्रा. यु. एल. अनुसे, इतर प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.