डॉ. रोंगे सरांनी माळरानावर ज्ञानाचे नंदनवन फुलवले -प्र-कुलगुरू डॉ.लक्ष्मीकांत दामा


डॉ. रोंगे सरांनी माळरानावर ज्ञानाचे नंदनवन फुलवले

                                                          -प्र-कुलगुरू डॉ.लक्ष्मीकांत दामा

स्वेरी मध्ये पहिला पदवीदान समारंभ संपन्न



पंढरपूर- ‘स्वेरीची वाटचाल पाहिली असता ‘आधी पत्रा, नंतर ‘आरसीसी’ आणि आता एसी’ अशी उपलब्धता झाली आहे. याचे खरे कारण म्हणजे डॉ. रोंगे सरांनी घेतलेले परिश्रम होय. तंत्रशिक्षणात नवनवे प्रयोग करून ते यशस्वी करून दाखवण्यासाठी जागवलेली तीव्र इच्छा, घेतलेले कठोर परिश्रम आणि त्याला मिळालेले अदभूत यश! हा प्रवास खरोखर कौतुकास्पद आहे. शैक्षणिक उपक्रमा बरोबरच कॅम्पसमध्ये निर्माण झालेले संशोधनाच्या वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या यशात भर पडत आहे. विद्यार्थ्यांनी करिअर करताना प्रयत्न करण्यापेक्षा ध्येय गाठण्याकडे अधिक लक्ष द्यावे. प्रयत्न हे कमी पडू शकतात पण ध्येय हे पूर्णत्वाला न्यावेच लागते. जसे की डॉ. रोंगे सरांनी स्वप्न पाहिले आणि या माळरानावर तंत्रशिक्षणाबरोबरच आता संशोधनाचे ज्ञानसंकुल उभे केले. त्यांनी केवळ प्रयत्नच केले नाहीत तर ध्येय पूर्ण केले. एकूणच डॉ. रोंगे सरांनी या माळरानावर ज्ञानाचे नंदनवन फुलवले आहे.’ असे प्रतिपादन पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे प्रभारी कुलगुरू डॉ.लक्ष्मीकांत दामा यांनी केले.

        गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचालित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने पहिला संस्थास्तरीय दीक्षांत समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्र.कुलगुरू डॉ.दामा हे बोलत होते. महाराष्ट्र गीत, विद्यापीठ गीत आणि स्वेरी गीतानंतर प्रास्ताविकात स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी. पी. रोंगे यांनी १९९८ साली स्थापन झालेल्या स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची आतापर्यंतची वाटचाल सांगून ‘रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात कसे झाले? याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की ‘स्वेरीमध्ये विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती राबवताना विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी न आवडणाऱ्या गोष्टीही कराव्या लागतात. केवळ परीक्षा वेळी अभ्यास करायचा’ ही विद्यार्थ्यांची मानसिकता बदलुन ‘सुरुवातीपासून अभ्यास करायचा’ ही विद्यार्थ्यांमध्ये मानसिकता निर्माण केली. अभियंता सर्वजण बनतात परंतु याठिकाणी चांगल्या पद्धतीचा मानवी चेहरा देण्यासाठी कधीकधी मनाविरुद्ध कार्य करावेच लागते. याचा परिणाम म्हणजे अल्पावधीत स्वेरीचा स्वतंत्र ‘ब्रँड’ तयार झाला. आता स्वेरी ब्रँड हा केवळ शिक्षणापुरता न राहता संस्थेच्या नावात असलेला ‘रिसर्च’ हा शब्द खऱ्या अर्थाने सत्यात उतरवायचे ठरविले आणि त्या दिशेने वाटचाल सुरु आहे.’ असे सांगून त्यांनी स्वेरीबाबतच्या विशेष नोंदी सांगितल्या. पुढे प्रभारी कुलगुरू डॉ.दामा यांनी ‘ज्ञानाची स्वेरी, आमुच्या मानाची स्वेरी ....’ या स्वेरीगीतामधील प्रत्येक शब्दातील अर्थ सांगून स्वेरीच्या यशाचे रहस्य उलगडले. शेवटी डॉ.दामा यांनी ‘प्रयत्न आणि ध्येय’ यात खूप फरक असल्याचे व्यासपीठावरच प्रात्यक्षिकाद्वारे स्पष्ट केले. प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी पदवीधरांकडून ‘शिक्षणाचे पावित्र्य जपण्यासाठी व राष्ट्रविकासासाठी उपदेश केला. यावेळी सन २०२२-२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे देवून पदवीप्रदान समारंभ करण्यात आला. पहिल्याच पदवीदान समारंभ प्रसंगी इमारतीच्या प्रवेशद्वारापासून ते आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉल पर्यंत ज्ञानदंड घेऊन ज्ञानदंडाची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये प्रभारी कुलगुरू यांच्यासह स्वेरीचे प्राचार्य, बी. फार्मसीचे प्राचार्य, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, पदवीधर व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी गेट परीक्षेमध्ये उज्वल यश मिळविलेल्या दहा विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला. यावेळी डॉ. राजशेखर येळीकर, पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, सोलापूर विद्यापीठ परीक्षा विभागाचे स्वेरीचे समन्वयक डॉ. सतीश लेंडवे, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी.मनियार, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, व विद्यार्थी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रम विभागाचे प्रमुख डॉ. यशपाल खेडकर आणि डॉ. नीता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. 


चौकट -सेल्फी पॉइंटला प्रचंड गर्दी 

स्वेरीत पहिला दीक्षांत समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या समारोपानंतर स्वेरी कॅम्पसच्या मुख्य पोर्च समोर लावलेल्या आकर्षक सेल्फी पॉइंटवर स्वेरीचे माजी विद्यार्थी अर्थात पदवीधर तरुणाईने सेल्फी घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. हे मात्र विशेष लक्ष वेधून घेत होते. सेल्फी पॉइंटच्या आकर्षक फलकावर विद्यापीठाचे चिन्ह, स्वेरी चिन्ह, एनबीए मानांकन, स्वेरीच्या रौप्य महोत्सवी वषाचे चिन्ह,नॅकचे ‘अ प्लस’ मानांकन लावले होते. या पॉइंटवर काढलेला सेल्फी छायाचित्र पदवीधर कायमचे जतन करणार हे मात्र निश्चित.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad