बौद्धिक प्रगल्भता यशाकडे घेवून जाते
- मुद्रांक निरीक्षक तेजस पवळ
स्वेरीत ‘क्षितीज २ के २४’ कार्यक्रम संपन्न
पंढरपूर- ‘क्षितीज २ के २४’ सारख्या तांत्रिक इव्हेंटमधून विद्यार्थ्यांना बौद्धिक क्षमतेला संशोधनाकडे नेण्यासाठी प्रेरणा मिळते. हीच प्रेरणा पुढे आपल्या विकासात गती आणते आणि विकासात सातत्य ठेवल्यास त्याची सवय बनते. यामुळे आपण इच्छित ध्येय सहजरित्या गाठू शकतो. यासाठी आपली गरीब परिस्थिती, अभ्यास करण्यासाठी योग्य जागा नाही, आर्थिक सुबत्तता कमी पडते या बाबी गौण ठरतात. प्रथम आपल्यातील हे न्यूनगंड दूर ठेवा. आपल्या नॉलेजवर एकाग्रतेने व आत्मविश्वासाने कार्य केल्यास यशासाठी फार काळ वाट पहावी लागणार नाही. त्यामुळे आपली बौद्धिक प्रगल्भता आपल्याला यशाच्या शिखराकडे घेवून जात असते.’ असे प्रतिपादन स्वेरीचे माजी विद्यार्थी व दुय्यम निबंधक (श्रेणी-१) मुद्रांक निरीक्षक अधिकारी तेजस उर्फ खंडू पवळ यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये मेसा (मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन), द इन्स्टिटयूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडीया), कोलकाता, स्टुडंट्स चॅप्टर आणि अमेरिकन सोसायटी ऑफ हिटिंग रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनींग (अॅश्रे) ची स्टुडंट ब्रांच यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील ‘क्षितीज २ के २४’ हा तांत्रिक संशोधन उपक्रम पार पडला. या उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय आयटीआयमध्ये शिक्षक, तलाठी, राज्य कर निरीक्षक (एसटीआय) व दुय्यम निबंधक (श्रेणी-१) मुद्रांक निरीक्षक अधिकारी अशा प्रशासकीय क्षेत्रात तब्बल चार नोकऱ्या मिळविलेले अधिकारी तेजस पवळ हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणतज्ञ व तंत्रशिक्षण संचालनालयाचे माजी संचालक व गव्हर्निंग बॉडीचे चेअरमन डॉ.एन.बी.पासलकर हे होते. दीपप्रज्वलनानंतर स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी सर्वांचे स्वागत करून ‘क्षितीज २ के २४’ हे आपल्यासाठी उपलब्ध केलेले व्यासपीठ असून याच्या माध्यमातून आपले संशोधन विकसित करण्यासाठी मदत मिळणार आहे. स्पर्धेशिवाय आपल्या परिश्रमाला गती येणार नाही.’ असे सांगून स्वेरीच्या वाटचालीबाबत सविस्तर सांगितले. पुढे बोलताना स्वेरीचे माजी विद्यार्थी व मुद्रांक निरीक्षक अधिकारी खंडू पवळ म्हणाले की ‘डॉ. रोंगे सरांचे मार्गदर्शन तर आहेच. सोबत आत्मविश्वास बळकट असेल, प्रचंड परिश्रम करण्याची तयारी असेल तर या जगात काहीही अशक्य नाही. मला प्रशासकीय क्षेत्रात जाण्यासाठी डॉ. रोंगे सरांचे व स्वेरीच्या प्राध्यापकांचे विचार व शिस्त कारणीभूत ठरली. प्रशासकीय क्षेत्रात जाण्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. नियमित अभ्यास, सराव, प्रेरणादायी मार्गदर्शन ऐकणे आणि योग्य दिशा पकडून वाटचाल केल्यास अवघड गोष्टीला सहज गवसणी घालता येते. कारण प्रयत्न केल्यास पराभव होत नाही. पण जिथे पर्याय नसतो त्याठिकाणी आपण ठामपणे उभे राहायचे असते.’ असे सांगून अधिकारी पवळ यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी केली ? सरकारी नोकरी करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतात, वेळेचे नियोजन कसे करावे ? याबाबत बहुमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेबाबत विचारलेल्या विविध प्रश्नांची अधिकारी पवळ यांनी समाधानकारक उत्तरे दिली. अध्यक्ष स्थानावरून बोलताना शिक्षणतज्ञ, तंत्रशिक्षण संचालनालयाचे माजी संचालक व गव्हर्निंग बॉडीचे चेअरमन डॉ.एन.बी.पासलकर म्हणाले की, ‘क्षितीज २ के २४’ सारख्या तांत्रिक संशोधनपर कार्यक्रमात आपले कौशल्य दाखून संशोधन क्षेत्रात आपली बुद्धिमत्ता सिद्ध करावी लागते. यामुळे आपला बौद्धिक विकास होतो.’ हे सांगून परदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शासकीय अनुदान कसे मिळते, यासाठी कोणत्या उपाय योजना कराव्यात? याची माहिती दिली. या तांत्रिक इव्हेंटमध्ये कॅड मास्टर, कॅम्पस रीकृटमेंट प्रोसेस (सीआरपी), टेक्नो क्वीज, पेपर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट एक्झीब्युशन, बीजीएमआय, आयडिया रेस व पोस्टर प्रेझेंटेशन असे एकूण आठ प्रकारचे इव्हेंट होते. सायंकाळच्या सत्रात ‘स्टडी ऑफ सोलार डिप्लॉयमेंट इन पंढरपूर’ या विषयावर स्वेरीत संशोधन करण्यासाठी ‘नेहरू पुलब्राईट यु.एस. स्टुडंट रिसर्च प्रोग्राम’ च्या माध्यमातून आलेले वर्जीनिया (वॉशिंग्टन, अमेरिका) येथील झॅकरी मरहंका यांच्या हस्ते प्राध्यापकांच्या उपस्थितीत विजेत्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना एकूण रु.२८ हजारांची रोख रक्कम, स्मृतीचिन्हे व प्रमाणपत्र देण्यात आली. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून जवळपास ३२० स्पर्धक,विद्यार्थी या टेक्निकल इव्हेंट मध्ये सहभागी झाले होते. सोलापूरहून स्पर्धेसाठी आलेले स्पर्धक श्वेता सगरे, अथर्व जोशी, वरद निरगुडे, प्रणाली जाधव या विद्यार्थ्यांनी ‘क्षितीज २ के २४’ च्या निमित्ताने स्वेरीने केलेल्या अदभूत सुविधेबाबत कौतुक केले. यावेळी विभागप्रमुख डॉ.एस.बी. भोसले, अॅश्रे स्टुडंट ब्रांचचे सल्लागार प्रा. डी.डी.रोंगे, मेसा समन्वयक प्रा. एस.एन. मोरे, आय.ई.आय., कोलकत्ता स्टूडंट चॅप्टरचे समन्वयक प्रा.डी.टी. काशीद, प्राध्यापक वर्ग, मेसाच्या अध्यक्षा आरती चौगुले, मेसाच्या सचिवा आकांक्षा हिंगमिरे, पदाधिकारी व विविध महाविद्यालयांतून आलेले सहभागी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वरी यादव, सुप्रिया शेलार व डॉ.वाय.एम. खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर मेसाचे उपाध्यक्ष अभिषेक मोर्डे यांनी आभार मानले.