शिवरायांनी मावळ्यांच्या अंतःकरणात राष्ट्रनिष्ठा पेरली. - समन्वयक प्रा. स्वामीराज भिसे स्वेरीत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती उत्साहात साजरी


शिवरायांनी मावळ्यांच्या अंतःकरणात राष्ट्रनिष्ठा पेरली.      

- समन्वयक प्रा. स्वामीराज भिसे

स्वेरीत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती उत्साहात साजरी



पंढरपूर- ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व योगदान अवघ्या विश्वात पोहचले आहे परंतु त्यांची सक्षम प्रशासकीय व्यवस्था जी त्यांनी अत्यंत प्रभावीपणे राबविली हा त्यांच्या कार्यातील अतिशय महत्वाचा भाग आहे. शिवरायांचे मावळे एवढे एकनिष्ठ होते की ते अखेरच्या श्वासापर्यंत कोणाच्याही आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी पडले नाहीत. कोणत्या ठिकाणी कोणत्या कामगिरीसाठी कोणता सैनिक नेमावा? हे राजांकडून शिकावे. कोंडाजी फर्जद यांना लढायला जाण्यापूर्वी त्यांना सोन्याचे कडे बक्षीस म्हणून दिले. यावरून ‘माणूस जिवंत असताना त्यांचा सन्मान करणे' राजांना खुप महत्वाचे वाटत असायचे. यावरून राजांच्या विचारांतील कल्पकता व नेतृत्वक्षमता समजते. त्यांनी मावळ्यांना स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे वागणूक दिली, आणि त्यांना जपले. त्यामुळे मावळ्यांच्या अंगी स्वराज्याबाबत आपलेपणाची भावना निर्माण झाली. एकूणच राजांनी सर्व मावळ्यांच्या अंतःकरणात राष्ट्रनिष्ठा पेरली होती म्हणून हिंदवी स्वराज्य निर्माण झाले.’ असे प्रतिपादन पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सांस्कृतिक विभागाचे समन्वयक प्रा. स्वामीराज भिसे यांनी केले.

          गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मध्यवर्ती असलेल्या भव्य ओपन एअर थिएटरमध्ये आयोजिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ व्या जयंती निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. स्वामीराज भिसे हे आपले विचार मांडत होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘प्रभावी प्रशासन’ या विषयावर अतिशय मौल्यवान विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मंत्रालयातील सचिव आनंदराव माळी हे होते तर विशेष अतिथी म्हणून विवेकवर्धिनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यु.आर.मुंडे हे उपस्थित होते. महाराष्ट्र गीत व स्वेरी गीतानंतर प्रास्तविकात स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम प्रशासक होते त्यामुळे ते परिस्थिती पाहून निर्णय घ्यायचे. निर्णय घेताना त्यांनी भावनिकतेला कुठेही थारा दिला नाही. आपल्याला यशस्वी जीवन जगायचे असेल तर त्यांच्या विचारांचा ठेवा आपण जपला पाहिजे.’ असे सांगून महाराजांच्या जीवनावर, शौर्यावर, कार्यावर, नेतृत्वावर आणि नियोजनावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला. प्रमुख पाहुणे प्रा. भिसे पुढे म्हणाले की, ‘रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे छत्रपती शिवाजी राजे हे ‘लोकपालक’ होते. राजांच्या सुव्यवस्थित प्रशासनामुळे समाजात शेतकऱ्यांचे सन्मानाचे स्थान प्राप्त झाले. एखादा मावळा शहीद झाला तर त्याच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी राजे स्वतः घेत असत. यासाठी त्यांनी विविध योजना अंमलात आणल्या. राजांनी नेहमी दूरदर्शी विचारसरणी ठेवून कार्य केले. राजांचे स्वराज्य हे त्यांच्या व मावळ्यांच्या भव्य दिव्य योगदानातून उभे राहिले कारण राजांच्या विचारांना विवेकाची जोड होती. म्हणून राजांची ‘प्रशासकीय व्यवस्था’ अत्यंत महत्त्वाची वाटते.’ यावेळी साईराम कलुबर्मे, साक्षी हुके, कल्याणी कुंभार, क्षितिजा हुराडे, गायत्री जाधव, सुमित बागल व मयंक लोटके यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी शिवरायांची महती सांगणारी भाषणे केली. यावेळी विवेकवर्धिनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यु.आर.मुंडे यांना भारत सरकारने मानद पदवी बहाल केल्यामुळे त्यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ.मुंडे म्हणाले की, ‘ग्रामीण भागातील विद्यार्थी हा चांगला घडावा यासाठी डॉ. रोंगे सरांनी याठिकाणी ज्ञानगंगा आणली. सुरुवातीपासून अनेक वादळे आली पण स्वेरीची घोडदौड कोणीही थांबवु शकले नाही आणि भविष्यातही कोणी थांबवु शकणार नाही. डॉ.रोंगे सर हे खूप बारकाईने अभ्यास करून त्यावर निर्णय घेतात. आपला वेळ कशासाठी असावा आणि त्याचा वापर कसा करावा हे मी डॉ.रोंगे सरांकडून शिकलो. हे कार्य करण्याची प्रेरणा मी रोंगे सरांकडून घेतली.’ अध्यक्षस्थानावरून बोलताना मंत्रालयातील सचिव आनंदराव माळी म्हणाले की, ‘शिवरायांच्या काळातील सैन्य, मावळे हे एकनिष्ठ होते, जिवाभावाचे होते. त्याउलट शत्रूचे सैन्य होते. यासाठी मित्र जमवताना देखील चांगल्या मित्रांमध्ये राहता आलं पाहिजे. यासाठी सहकारी देखील महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध असावे व शालेय जीवनात मोबाईलचा वापर कमीत कमी करावा. येथील विद्यार्थ्यांनी एमपीएससी व यूपीएससीच्या अधिक स्पर्धा परीक्षा देण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी प्रशासकीय सोई सुविधांचा लाभ घ्यावा. एकूणच जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण वेळ कुठे घालवला पाहिजे आणि कुठे घालवितो याची जाणीव असली पाहिजे.' स्वेरीच्या ख्याती बद्दल बोलताना पुढे ते म्हणाले की, 'माझा भाऊ अमर हा देखील स्वेरीचा माजी विद्यार्थी असून त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याला नोकरीच्या अनेक संधी मिळाल्या. गेट या परीक्षेत ९९ पेक्षा जास्त स्कोअर घेऊन आज तो एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या करिअर मध्ये स्वेरी अतिशय भरीव असे कार्य करत आहे.' यावेळी आर्किड इंजिनिअरिंग कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ.जे. पी. दफेदार, स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट, खेड चे प्राचार्य डॉ.एस. एस. पाटील, भीमराव जाधव, स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त प्रा. सी.बी. नाडगौडा, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी.रोंगे, श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन व स्वेरीच्या विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे, युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, कॅम्पसचे इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतीश मांडवे, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग, इंजिनिअरिंग व फार्मसीचे स्टुडंट कौन्सिलचे सचिव आदित्य जगदाळे, पूजा बत्तुल आणि इंजिनिअरिंग व फार्मसीमधील चारही महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. आदित्य भुसनर व डॉ.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad