स्वेरीतील मेसाच्या विद्यार्थ्यांची मातोश्री वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट
पंढरपूर- ‘मातोश्री वृद्धाश्रमासाठी एक प्रकारची ऊर्जा देणारा ठरावा असा उपक्रम स्वेरीच्या मेसा मधील विद्यार्थ्याकडून हाती घेण्यात आला. त्याचे झाले असे! स्वेरीतील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी गोपाळपूरमधील श्री.संत तनपुरे महाराज संचलित मातोश्री वृद्धाश्रमाला भेट देवून काही काळ तेथील वृद्ध आजी आजोबांसोबत घालविला. सर्व विद्यार्थी त्यांच्या समवेत प्रेम व आपुलकीची देवाण-घेवाण करून आनंदी मुद्रेने परतले.
स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक उपक्रमाबरोबरच अनेक विधायक व सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून स्वेरीतील मेसा तथा मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडन्टस असोसिएशन च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मातोश्री वृद्धाश्रमाला भेट दिली. सुरुवातीला मेसाचे समन्वयक प्रा. एस.एन. मोरे यांनी मातोश्री वृद्धाश्रमामध्ये येण्याचे प्रयोजन सांगितले. वृद्धाश्रमाचे संचालक धनंजय राक्षे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाटन झाले. प्रा.के.एस.पुकाळे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उपयोगी व प्रेरणादायी कार्य करण्यासाठी प्रेरित केले. वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक धनंजय राक्षे, श्रीकांत देशपांडे व सुनंदा छत्रे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना वृद्धाश्रमाबाबत व तेथील कार्याबाबत माहिती दिली. वृद्धाश्रमात सफरचंद, केळी, फळे, लाडू इ. खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. यावेळी तेथील वृद्ध महिला व आजोबा मंडळी यांची आपुलकीने विचारपूस केली असता त्या वृद्धांनी मायेने विद्यार्थ्यांच्या अंगा खांद्यावरून हात फिरविला. साधारणपणे दोन तास त्यांच्यासोबत राहिल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचा निरोप घेतला. एकूणच विद्यार्थी आणि वृद्घाश्रमातील नागरिकांची अविस्मरणीय अशी भेट झाली. या कार्यक्रमात आदित्य चोरमले, प्रणव पाटील, प्रियांका सोनवले, संस्कृती मोरे, प्रतीक यादव, प्रतिक येडवे, यांच्या सहित जवळपास १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजिलेल्या या भेटीच्या कार्यक्रमात विभागप्रमुख डॉ.एस. बी. भोसले, डॉ.एस.एस. वांगीकर, प्रा.डी. टी. काशीद, प्रा.पी.बी. आसबे आदी शिक्षक उपस्थित होते. आरती चौगुले व अभिषेक मोर्डे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर विद्यार्थी प्रतिनिधी श्रुती इंगळे यांनी आभार मानले.