शिक्षणानंतर माजी विद्यार्थ्यांचे आपापसातील नेटवर्किंग मजबूत असावे - सिडॅकचे जेष्ठ संचालक व इस्त्रोचे माजी शास्त्रज्ञ वसंत अवघडे पुण्यातील ‘राष्ट्रसेवा दलाच्या फुले सभागृहात स्वेरीचा ‘ऋणानुबंध २०२३’ संपन्न

                                                                                                                                                                             

शिक्षणानंतर माजी विद्यार्थ्यांचे आपापसातील नेटवर्किंग मजबूत असावे

                                                                     - सिडॅकचे जेष्ठ संचालक व इस्त्रोचे माजी शास्त्रज्ञ वसंत अवघडे

पुण्यातील ‘राष्ट्रसेवा दलाच्या फुले सभागृहात स्वेरीचा ‘ऋणानुबंध २०२३’ संपन्न



पंढरपूरः ‘महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर गुरु, शिष्य व मित्र यांच्या माध्यमातून आपापसातील व महाविद्यालयासोबतचे कॉन्टॅक्ट, कनेक्शन आणि नेटवर्किंग हे मजबूत असावेत तसेच शिकत असलेल्या इतर विद्यार्थ्यांनाही करिअरच्या दृष्टीने चांगला रस्ता मिळेल याचाही प्रयत्न माजी विद्यार्थ्यांनी केला तर खऱ्या अर्थाने स्वेरी मधून घेतलेल्या शिक्षणाबरोबरच संस्कार देखील आपण जपतो आहोत हे स्पष्ट होते.’ असे प्रतिपादन सिडॅकचे जेष्ठ संचालक व इस्त्रोचे माजी शास्त्रज्ञ वसंत अवघडे यांनी केले.

      पंढरपूरच्या स्वेरी अभियांत्रिकी व एमबीएच्या माजी विद्यार्थ्यांचा ‘ऋणानुबंध २०२३-२४’ हा मेळावा पुण्यातील ‘राष्ट्रसेवादल भवन, पर्वती पायथा, सिंहगड रोड, मधील फुले सभागृहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिडॅकचे जेष्ठ संचालक व इस्त्रोचे माजी शास्त्रज्ञ वसंत अवघडे हे मार्गदर्शन करत होते. दिपप्रज्वलनानंतर सुमधुर स्वेरी गीताने कार्यक्रमाला सुरवात झाली. स्वेरी अभियांत्रिकीच्या ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट चे अधिष्ठाता व माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्रा. ए. ए. मोटे यांनी पुण्यात मेळावा आयोजित करण्याचा हेतू सांगून माजी विद्यार्थी संघटनेच्या यशस्वी वाटचाली बद्धल माहिती सांगितली. या मेळाव्यात कोणी प्रशासकिय अधिकारी, कोणाची स्वतःची कंपनी, कोणी परदेशात स्थायिक, काही जण प्राध्यापक, कोणी उद्योजक, तर काहीजणी गृहिणी झाल्या होत्या. हे सर्वच जण ‘माजी विद्यार्थी मेळाव्या’च्या निमित्ताने फुले सभागृहामध्ये एकत्रित आले होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना, वाटचाल व आजपर्यंतचा प्रवास त्याला स्वेरीमुळे आलेले यश हे सारे शब्दात सांगत होते. ‘हार्ड वर्क’ शिस्त व संस्कार या स्वेरीमधून मिळालेल्या शिदोरीमुळे आपण जीवनात यशस्वी होत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. ज्यावेळी कंपनीत नोकरीकरिता रुजू झालो त्यावेळी स्वेरीतून अंगीकारलेली शिस्त व प्राध्यापकांनी आमच्यावर केलेले अनमोल संस्कार याचा आज खूप फायदा होत आहे. त्यामुळे स्वेरीच्या अभ्यासपूरक वातावरणाला व काही जणांनी जागतिक स्तरावर रुजवलेल्या शिस्तीचा फायदा कसा होतो ? हे पटवून दिले. स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे यांनी माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करिअर डेव्हलपमेंटसाठी माजी विद्यार्थ्यांचा होणारा सपोर्ट या बाबी प्रामुख्याने नमूद केल्या. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘जिद्द, कठोर मेहनत आणि डिसिप्लीन याच्या माध्यमातून जीवनात यश कसे मिळवले जावू शकते' यावर प्रकाश टाकला. माजी विद्यार्थ्यांसमवेत त्यांनी  मनमोकळेपणाने संवाद साधला. माजी विद्यार्थी संघटना विविध प्रकारे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आणि स्वेरीच्या जडण घडणीत मोलाचा सहभाग नोंदवत आहेत. माजी विद्यार्थी स्वेरीला वेळोवेळी भेट देवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात याचबरोबर विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळण्यासाठी मदत करतात. माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून टॉपर विद्यार्थ्यांना सुवर्णपदक दिले जाते व प्राध्यापकांना संशोधनासाठी निधी दिला जातो. अशा वेगवेगळ्या प्रकारे माजी विद्यार्थी संघटना कार्य करत आहे. यावेळी माजी विद्यार्थी तानाजी वलेकर, सुबोध डोळसे, सारंग रेवडकर, विश्वनाथ माळी, अश्विनी करपे, सतिश उमदी, प्रा.विक्रम मगर, दत्ता माळी, डॉ. प्रदीप जाधव, त्रिवेणी गायकवाड, भूषण शहाणे, साईनाथ वाघडकर, सागर पवार, सोनम जहागिरदार, दत्ता कांबळे, गायत्री अपसिंगकर, यांच्यासह काही माजी विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करून भावना मांडल्या. यामध्ये अभियांत्रिकीच्या व एमबीए च्या स्थापनेपासून ते गतवर्षी उत्तीर्ण झालेले जवळपास ३५० हून अधिक विद्यार्थी, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, प्रशासन अधिष्ठाता डॉ.रणजित गिड्डे, इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. माजी विद्यार्थी मेळाव्यात मनोगत सुरु असताना प्रोजेक्टच्या माध्यमातून स्थापनेपासून ते गत वर्षापर्यंतचे ‘ऋणानुबंध’ मेळाव्याची विशेष क्षणचित्रे दाखवली जात  होती. हा मेळावा यशस्वी होण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ.यशपाल खेडकर यांनी केले तर स्वेरीच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गुरुप्रसाद तेलकर यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad