स्वेरीत शिक्षण घेतोय अमेरिकेचा विद्यार्थी
‘नेहरू पुलब्राईट युएस स्टुडंट रिसर्च प्रोग्राम’ तर्फे स्वेरीच्या संशोधन विभागात कार्यरत
पंढरपूर- स्वेरीतून मिळणाऱ्या शिक्षणाचे महत्व आता सातासमुद्रापार असलेल्या विद्यार्थ्यांना देखील माहित झाले आहे. त्याचेच द्योतक म्हणजे स्वेरीत आता यु.एस.ए (अमेरिका) मधील एका विद्यार्थ्याने नुकताच संशोधन विभागात अभ्यासासाठी प्रवेश घेतला आहे, अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
नावातच संशोधन असलेल्या श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट तथा स्वेरी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात संशोधन विभाग हा स्वतंत्रपणे कार्यरत असून आजपर्यंत साधारण रु.४४.३४ कोटीपर्यंत संशोधन निधी प्राप्त झाला असून संशोधन विभागाच्या माध्यमातून अनेक प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत तसेच आणखी काही प्रकल्प सुरु आहेत. वर्जीनिया (वॉशिंग्टन, अमेरिका) मधील झॅकरी मरहंका हा विद्यार्थी सध्या 'स्टडी ऑफ सोलार डिप्लॉयमेंट इन पंढरपूर’ या विषयावर स्वेरीत शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनखाली संशोधन कार्य करत असून त्यांना ‘नेहरू पुलब्राईट यु.एस. स्टुडंट रिसर्च प्रोग्राम’ च्या माध्यमातून दि.२६ ऑगस्ट २०२३ ते २५ ऑगस्ट २०२४ या एक वर्षाच्या कालावधीसाठी इकडे पाठवण्यात आले आहे. त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च हा नेहरू पूलब्राइट स्कॉलरशीप च्या माध्यमातून केला जात आहे. झॅकरी मरहंका रिसर्च स्कॉलर (संशोधक विद्यार्थी) असून रिसर्च इन इकॉनोमिक्स अँड ग्लोबल स्टडीज, युनिव्हर्सिटी ऑफ वर्जीनीया मध्ये ते शिक्षण घेत आहेत. मरहंका यांनी पुण्यात मराठी भाषेचा देखील अभ्यास सुरू केला असून ते मराठी मधून संभाषण करू लागले आहेत. ‘स्वेरीत आल्यावर सुरुवातीला हे केवळ एक महाविद्यालय असेल असे वाटले होते पण नंतर संशोधनात्मक अभ्यास करताना स्वेरीच्या संशोधन सुविधा किती उच्च पातळीच्या आहेत ते लक्षात आले. वेळ काळ न पाहता इथे संशोधन विभागातील प्राध्यापक वर्ग संशोधन प्रकल्प पूर्ण करत आहेत. ही बाब भविष्याच्या दृष्टीने नक्कीच अनुकरणीय आहे. शोध प्रकल्पात एकाग्रता महत्वाची असते आणि इथे एकाग्रते बरोबरच समाधान देखील मिळते.’ असे ते म्हणाले. सोलार वर आधारित पाणी उपसण्याचे पंप, त्यांचे कार्य, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अशा पंपांचे महत्त्व, सोलार पंप वापरण्यातील समस्या आदी बाबींचा ते अभ्यास करणार आहेत. त्यासाठी पंढरपूर तालुक्यातील विविध गावात जाऊन तेथील शेतकऱ्यांच्या मुलाखती घेऊन तंत्रज्ञानाच्या आधारे त्यांचे प्रश्न कसे सोडवले जाऊ शकतील याबाबत ते संशोधन करणार आहेत. त्यांचे संशोधन कार्य हे ग्रामीण शेतकऱ्यांच्या दृष्टीने नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे विश्वस्त बी.डी.रोंगे, शैक्षणिक अधिष्ठाता व मार्गदर्शक डॉ. प्रशांत पवार, संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ.अमरजीत केने यांच्यासह अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.