मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांसाठी डीपी व नवीन सबस्टेशन उभा करण्यासाठी ना.फडणवीस यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा करणार -आ आवताडे
प्रतिनिधी-
पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये शेतकऱ्यांच्या वीजप्रश्न अनुषंगाने नवीन डीपी व सबस्टेशन यांच्या निर्मितीसाठी आपण राज्याची उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून यासंदर्भात भरीव निधीची मागणी करणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले आहे. मतदार संघातील पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याचा गाव भेट दौरा करत असताना अनेक शेतकरी व नागरिकांनी आमदार आवताडे यांच्याकडे पुरेशा वीज उपलब्धतेची मागणी करत असताना नवीन डीपी व सर्व स्टेशन उभा करण्याची मागणी केली आहे. शेतीला पाणी देण्यासाठी पुरेसा वीज दाब उपलब्ध होत नसल्याने मोटार यंत्र जळणे व वीज पुरवठ्याच्या संदर्भात इतर समस्या निर्माण होत असल्याची गाऱ्हाणी आमदार आवताडे यांच्या समोर शेतकऱ्यांनी मांडल्या या निधीची मागणी करणार असल्याचे सांगितले.
मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्यामध्ये आ आवताडे यांचा ४२ विभागांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत गावभेट दौरा सुरु आहे. आमदार आपल्या दारी अभियाना अंतर्गत आ आवताडे यांनी रविवारी बठाण, उचेठाण, धर्मगांव, ढवळस, शरदनगर, मल्लेवाडी, घरनिकी, मारापूर या गावांचा दौरा करुन जनतेच्या अडी-अडचणी व समस्या जाणून घेतल्या आहेत. सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना असून त्या योजना अंतर्गत लाभार्थी असणाऱ्या नागरिकांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विनाकारण कागदी घोडे न नाचवता जनतेला जास्तीत-जास्त सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.
उचेठाण येथील गावअंतर्गत असणाऱ्या व दैनंदिन रहदारीसाठी अतिशय महत्वपूर्ण रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे त्या रस्त्याबाबत आ आवताडे यांनी ग्रामस्थांच्या व्यथा जाणून सदर रस्ता लवकरत-लवकर नागरिकांसाठी सुधारणा अवस्थेत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या असता, हा रस्ता येत्या ८ ते १० दिवसांमध्ये तयार करुन देण्याचे संबंधित विभागाने मान्य केले आहे. त्याचबरोबर अनेक गावांमध्ये आमदार स्थानिक निधी व इतर निधीतून मंजूर झालेली विविध विकास कामे अपूर्ण अवस्थेत असून ती त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना आ आवताडे यांनी दिल्या आहेत.
तसेच तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर कामे दर्जात्मक पद्धतीने करण्याचे आ आवताडे यांनी सूचित केले आहे. नागरिकांच्या व गावाच्या भौतिक विकास दृष्टीने या योजनेची कामे खूप महत्वाची असल्याने गुणवत्तेच्या बाबतीत आपण कोणतीही हयगय खपवून घेणार नसल्याचे आ आवताडे यांनी स्पष्ट केले आहे.