धाडस आणि परिश्रमाने यश नक्की मिळते
-चेअरमन व उद्योजक अभिजित पाटील
‘माझी उद्योजक जगतातील वाटचाल’ या विषयावर विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन
पंढरपूर- ‘क्षेत्र कोणतेही असो, यशस्वी व्हायचे असेल तर खडतर परिश्रम हे करावेच लागतात. शिक्षण घेत असताना ‘आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो’ या भावनेने मी माझे सामाजिक कार्य सुरू केले आणि मागील दहा वर्षाच्या कारकिर्दीत वेळप्रसंगी उचललेल्या धाडसी पावलांमुळे मला यश मिळत गेले. कोरोनाच्या काळात आईच्या आजारामुळे ऑक्सिजनचे महत्त्व समजले. परिस्थिती बिकट होती म्हणून त्या परिस्थितीत ऑक्सिजनमुळे कोणी माणूस कुटुंबापासून दुरावू नये यासाठी सर्वप्रथम रुग्णालये स्थापन केली आणि त्यात मोफत उपचाराची सोय केली. तेंव्हापासून माझी ऑक्सिजनमुळे नव्याने ओळख निर्माण झाली. यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर परिश्रमाबरोबरच सोबतीला धाडस हा गुण देखील महत्वाचा आहे कारण धाडसाने यश नक्की मिळते.’ असे प्रतिपादन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणूनगर, गुरसाळेचे चेअरमन व युवा उद्योजक अभिजित पाटील यांनी केले.
स्वेरीच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने वर्षभर विविध उपक्रम, करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी व्याख्याने यांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांच्या अखेरच्या टप्यात अल्पावधीत युवकांचे ऑयकॉन झालेले युवा उद्योजक व वेणुनगर, गुरसाळे येथील श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे ‘माझी उद्योजक जगतातील वाटचाल’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. दीप प्रज्वलनानंतर संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून प्रास्ताविकात युवकांचे प्रेरणा स्थान असणारे उद्योजक अभिजित पाटील यांचा परिचय करून देताना म्हणाले की, ‘शून्यापासून सुरुवात करून सहा साखर कारखान्यापर्यंत मजल मारणारे अभिजित आबा पाटील यांच्या नित्य कार्याचा विचार केला तर परिश्रमाच्या अनुभवाची अनुभूती मिळते. कार्य कोणतेही असो, सातत्याने परिश्रम करणे ही बाब त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. ज्या क्षेत्रात आपण कार्य करतो त्या क्षेत्रातील सखोल ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. वेळ प्रसंगी धाडसाने पाऊल उचलल्यास आत्मविश्वास दुपटीने वाढतो आणि यश पदरी पडते.’ असे सांगून डॉ. रोंगे यांनी उद्योजक अभिजित पाटील यांच्या सहवासात आलेले अनुभव सांगितले तसेच स्वेरीच्या या रौप्य महोत्सवी वाटचालीत आलेल्या अडचणी, त्यासाठी केलेले परिश्रम आणि मिळालेले अभूतपूर्व यश यावर प्रकाश टाकला. पुढे बोलताना आबासाहेब पाटील म्हणाले कि, ‘उद्योजक होत असताना सर्वप्रथम निर्व्यसनी असणे गरजेचे आहे. त्यामुळे निर्णय घेण्याच्या क्षमतेत वाढ होते. निर्णय चुकीचा असला तरी तो बरोबर करून दाखवण्याची धमक असली पाहिजे. कारण ‘धाडसाने यश नक्कीच मिळते परंतु प्रयत्न योग्य दिशेने केले पाहिजेत आणि निर्णय पक्का असला पाहिजे. आपले मित्र ही आपली सर्वात महत्वाची ताकद असते. त्यामुळे मित्रांची जपणूक केली पाहिजे. व्यवसाय वेगळा असो, क्षेत्रे वेगवेगळी असो परंतु त्यात एकत्रीकरण असणे हे महत्त्वाचे आहे. उद्योग करताना मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग, सर्विसेस हे महत्त्वाचे धागे आहेत. त्यांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. व्यवसाय उद्योग करताना सर्व बाबींचा विचार करावा लागतो, आवाका वाढवावा लागतो. बँक व्यवसाय, मार्केटिंग, विक्री, वाहतूक आदी महत्त्वाच्या बाबींचा अभ्यास करावा लागतो. आपल्याला ‘मर्यादित क्षेत्रात अमर्यादित काम’ करता आले पाहिजे. उद्योग जगताची नजर आणि युवकांची गरज ही ओळखता आली तर यश नक्की मिळते. कोणताही व्यवसाय करा पण स्वतःला वेळेबरोबर अपग्रेड करता आले पाहिजे. सध्याच्या युगात नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे होणे, ही सध्या काळाची गरज आहे. सध्याच्या बाजारपेठेत औद्योगिक क्षेत्रात संधी भरपूर आहेत परंतु त्या वेळेत ओळखता आल्या पाहिजेत. यासाठी आपणही उद्योजक बनावे आणि त्यासंदर्भात अडचण आली तर मला हाक द्या, मी साथ देईन.’ असेही सांगितले. तब्बल तीन तास चाललेल्या या संवादपर व्याख्यानानंतर उद्योजकतेबाबत विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले. त्या सर्व प्रश्नांची चेअरमन अभिजित पाटील यांनी समर्पक व अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. सोशल मिडियाच्या जगात मोबाईल वापराचा अतिरेक होत आहे याला आवर घालणे गरजेचे आहे. जीवनात सोबतच्या मित्रांनी आणि व्यवसायात धाडसीपणाने मला खऱ्या अर्थाने यशाच्या शिखरावर पोहचवले. त्यामुळे सोबतचे मित्र हे उर्जा देणारे असावेत.’ असेही चेअरमन अभिजित पाटील यांनी सांगितले. यावेळी स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा. सूरज रोंगे, विश्वस्त बी.डी.रोंगे, संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त नामदेवराव कागदे, विश्वस्त एच. एम. बागल, डॉ. राजेंद्र यादव, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सौ.प्रेमलता रोंगे, सरपंच विक्रम आसबे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, पालक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग व संवाद प्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी केले तर संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.