शरीर आणि मनाची एकरूपता साधण्यासाठी योग गरजेचा
-प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे
स्वेरीमध्ये नववा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटच्या क्रीडांगणावर राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून नववा ‘जागतिक योग दिन’ साजरा करण्यात आला. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाने या सत्राची सुरुवात झाली.
या योग सत्रात योग प्रशिक्षिका म्हणून स्वाती मिसाळ यांनी मार्गदर्शन केले. ‘नियमितच्या योगामुळे स्मरणशक्ती वाढते. योगा केल्यामुळे आपण आपल्या क्षमतेचा किती वापर करतो हे समजते. स्पर्धेच्या युगात आपण पैशाने मोठे झालो आहोत पण या धकाधकीच्या जीवनात शरीर आणि मन उत्साहित, प्रफुल्लीत ठेवणे आवश्यक आहे. शरीर उत्तम असेल तर आपण अधिक पैसा कमवू शकतो कारण श्वासाच्या गतीवर मनाची स्थिती अवलंबून असते आणि मनाच्या स्थितीवर जीवनातील ऊर्जा अवलंबून आहे. यासाठी आसन, प्राणायाम आणि ध्यान या त्रिसूत्रीचा जीवनात वापर आवश्यक आहे. या त्रिसूत्रीमुळे मनाचे शुद्धीकरण होते. शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती साठी योग हा अतिशय गरजेचा आहे. प्राणायाम करताना थोडा त्रास होतो पण त्याचा फायदा दीर्घकाळ होतो.' असे प्रतिपादन योग प्रशिक्षिका स्वाती मिसाळ यांनी केले. सकाळी सहा वाजता सुरु झालेल्या या योग सत्रामध्ये पदवी अभियांत्रिकी, पदविका अभियांत्रिकी, बी.फार्मसी व डी. फार्मसी मधील प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, कमवा व शिका योजनेतील विद्यार्थी, तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी योग प्रशिक्षिका स्वाती मिसाळ पुढे म्हणाल्या की, ‘योगामुळे आरोग्य सदृढ होते त्यामुळे दररोज योग करणे गरजेचे आहे. योग हा शरीर स्वास्थ्य आणि मनाच्या एकाग्रतेबरोबर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा व्यायाम करुन घेतो. त्यामुळे मनाला अजून बळकटी मिळते. आपल्या सतरा हजार नाड्या श्वासामुळे जागृत होतात त्यामुळे अधिक उत्साह जाणवतो. मन आणि आरोग्य बळकट असेल तर शरीर सदृढ राहून अंगीकृत कार्याला यश मिळते. यासाठी मन, शरीर आणि आत्मा संतुलित राहण्यासाठी नियमित योगाची गरज आहे.’ स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘योग’ हा आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करावा हा विषय युनायटेड नेशन्सच्या व्यासपीठावर मांडला आणि त्यानुसार २०१५ पासून २१ जून हा ‘जागतिक योग दिवस’ म्हणून संपूर्ण विश्वात साजरा केला जातो. सुरुवातीला योग हा फक्त काही ठराविक समुदायांकडूनच केला जायचा. त्यासाठी विशेष असे प्रशिक्षण घ्यावे लागायचे आणि निष्णात तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग करावा लागत असे. पण आता ती बंधने नाहीशी झाली आहेत. त्यामुळे सर्वसाधारण तुमच्या-माझ्या सारख्या व्यक्ती सुद्धा योगा करू शकतात. शरीर आणि मनाची एकरूपता साधण्यासाठी श्वासोच्छवासाच्या माध्यमातून योग महत्त्वाची भूमिका बजावतो.’ सदर योग सत्र हे तब्बल दोन तास चालले. प्राणायम, आसने यातून शरीराच्या हालचाली कशा असाव्यात, योगाचे नियम, वेळ, आदी महत्वाच्या गोष्टी प्रशिक्षक स्वाती मिसाळ यांनी सांगितल्या. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजिलेल्या ‘जागतिक योग दिन’ या कार्यक्रमात संस्थेचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम. एस. मठपती, राष्ट्रीय सेवा योजना कार्याधिकारी डॉ. डी. एस. चौधरी, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व समन्वयक, यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. प्रा.संदिपराज साळुंखे यांनी सुत्रसंचालन केले तर डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांनी आभार मानले.