ज्ञानासोबतच आत्मविश्वास देखील महत्वाचा - उद्योजक सुभाष काकडे
स्वेरीत ‘क्षितीज २ के २३’ हा उपक्रम संपन्न
पंढरपूर- ‘आजच्या जगात यशस्वी होण्यासाठी केवळ पुस्तकी शिक्षण असून चालत नाही तर त्यासाठी बाह्य जगातील व्यवहारज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी प्रात्यक्षिकांचे खुप महत्व आहे. शिक्षणाचा वापर कसा करायचा हे आपल्या गुणवत्तेवर अवलंबून आहे. ‘आपण नेमके कोण आहोत’ हे बाहेरील विश्वात गेल्याशिवाय समजत नाही. स्वेरीमध्ये माझ्या अभ्यासाची व करिअरची तयारी उत्तम प्रकारे करून घेतली गेली त्यामुळे पाया भक्कम झाला आणि पुढे उद्योगात भरारी घेण्यासाठी मदत मिळाली. कोणतीही गोष्ट मनापासून केली तर यश दूर नसते. ‘क्षितीज २ के २३’ सारख्या तांत्रिक इव्हेंटमधून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला संशोधनाकडे नेण्यासाठी प्रेरणा मिळते आणि हीच बौद्धिक प्रगल्भता आपल्याला यशाच्या शिखराकडे घेवून जाते. एकूणच ज्ञानासोबतच आपल्याकडे आत्मविश्वास असला पाहिजे.’ असे प्रतिपादन स्वेरीचे माजी विद्यार्थी व तांदुळवाडी (ता.पंढरपूर) येथील काकडे अॅग्रो इक्युपमेंट्स या कंपनीचे मालक व उद्योजक सुभाष काकडे यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये मेसा (मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन), द.इन्स्टिटयूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडीया), कोलकाता स्टुडंट्स चॅप्टर आणि अमेरिकन सोसायटी ऑफ हिटिंग रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनींग (अॅश्रे) च्या पुणे चॅप्टर (अॅश्रे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘क्षितीज २ के २३’ या तांत्रिक संशोधन उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक सुभाष काकडे मार्गदर्शन करत होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख डॉ. एस.एस. वांगीकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हाईस प्रेसिडेंट अवंतिका आसबे व आदित्य भूसनर यांनी केले आणि ‘क्षितीज २ के २३’ इव्हेंट विषयी सविस्तर माहिती दिली. पुढे बोलताना उद्योजक काकडे म्हणाले की ‘प्रशासकीय नोकरी झुगारून मी स्वतःची कंपनी काढली, कंपनीत आज १५ होतकरू तरुणांना सामावून घेतले असून अफाट परिश्रमाच्या बळावर माझ्या कंपनीची वार्षिक उलाढाल साडेपाच कोटी पर्यंत आहे. स्वतः शासकीय नोकरी पेक्षा अनेकांना नोकरी देवू शकतो. या ध्येयाने विचार करून कोकणात लागलेली शासकीय नोकरी ३ वर्षे करून सोडली व आज स्वतःची कंपनी काढली. आत्मविश्वास बळकट असेल तर या जगात काहीही अशक्य नाही. खऱ्या अर्थाने मला मानसिक बळकटी मिळण्यास स्वेरीची खूप मदत झाली. प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे सरांच्या प्रत्येक विचारांच्या आणि संस्कारांच्या शिदोरीवर आज मी स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा आहे.’ असे सांगून 'नोकरीच्या मागे न लागता उद्योग क्षेत्राकडे वळा.’ असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी कुतूहलाने यशाची सूत्रे जाणून घेत काकडे यांच्या उद्योगाबाबत आणि यशाबाबत अनेक प्रश्न विचारले. ‘या तांत्रिक इव्हेंटमध्ये टेक्नो क्वीज, आयडिया रेस, पोस्टर प्रेझेंटेशन, कॅम्पस रिकृटमेंट प्रोग्राम (सीआरपी), कॅड मास्टर, पेपर प्रेझेंटेशन व ट्रेझर हंट असे एकूण सात प्रकारचे इव्हेंट होते. ‘क्षितीज २ के २३’ च्या यशासाठी आदित्य नकाते, ऋत्विक पाटील, साक्षी मोरे, यश ठिगळे, आयुष वाळे, आदिती कदम, दक्षता खरे, शितल धर्माधिकारी, यश काटमोरे, केदार अभ्यंकर, प्रगती साळुंखे, आकांक्षा शेळके, प्रथमेश साळुंखे, मानसी चव्हाण, चेतन टमटम, अश्विनी बोडके आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.एम.एस.मठपती यांच्या हस्ते पारितोषक वितरण करण्यात आले. यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांना एकूण रु.२५ हजारांची रोख रक्कम, स्मृतीचिन्हे व प्रमाणपत्रे देण्यात आली. याउपक्रमात सोलापूर जिल्ह्यातील १४ महाविद्यालयातील जवळपास ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी वर्कशॉप इन्चार्ज प्रा.बी.डी.गायकवाड, प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा.सचिन खोमणे, उद्योजक सुभाष काकडे, विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर, अमेरिकन सोसायटी ऑफ हिटिंग रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनींग (अॅश्रे) चे अध्यक्ष प्रा.दिग्विजय रोंगे, मेसाचे अध्यक्ष निलेश ढेकळे, सिद्धेश्वर वुमन्सच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी रोहिणी वाघमारे, मेसाचे पदाधिकारी व विविध महाविद्यालयांतून आलेले सहभागी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी फैज शेख आणि आसावरी भोसले यांनी सूत्रसंचालन केले तर क्षितीजचे समन्वयक प्रा.संजय मोरे यांनी आभार मानले.