वारीमध्ये गर्दी व्यवस्थापनासाठी स्वेरी परिवार सज्ज
‘तीर्थक्षेत्र पोलीस: आषाढी वारी २०२२’ मोहिमेत स्वेरीचा सहभाग
पंढरपूर- कोरोनाचा प्रकोप संपल्यानंतर यंदा दोन वर्षानंतर प्रथमच आषाढी वारी भरवण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला असून ही वारी सुव्यवस्थित पणे पार पाडण्यासाठी जय्यत तयारी देखील सुरु आहे. या वारीमध्ये वारकऱ्यांची वाढती गर्दी पाहता दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रशासनाने गर्दी व्यवस्थापनासाठी स्वेरीच्या विद्यार्थी व प्राध्यापकांची मदत घेण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. त्या अनुषंगाने शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना समाजाप्रती बांधिलकी जोपासण्याच्या दृष्टीने व प्रशासनावर येणारा अधिकचा ताण कमी करण्याकरिता स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयातील ५० प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली १०० विद्यार्थी सहभागी होत आहेत.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी माहिती दिली.
कोरोनानंतर प्रथमच विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची गर्दी वाढण्याची शक्यता पाहून स्वेरीने नेहमीप्रमाणे यावेळीही वारीकाळात आपले योगदान देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार ‘तीर्थक्षेत्र पोलीस: आषाढी वारी २०२२’ या मोहिमेत बुधवार, दि.०६ जुलै पासून ते मंगळवार, दि. १२ जुलै दरम्यान रात्रंदिवस स्वेरीचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी होणार आहेत. शहरातील प्रमुख गजबजलेल्या ठिकाणी जसे- छत्रपती शिवाजी महाराज चौक, गौतम विद्यालय, अंबाबाई पटांगण, चंद्रभागा मैदान आणि एसटी स्टँड परिसर या महत्त्वाच्या पाच परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते वारकऱ्यांना सहकार्य व मार्गदर्शन करणार आहेत. स्वेरीच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या समाजसेवी कार्यामुळे बंदोबस्ताचा प्रशासनावरील ताण थोड्या प्रमाणात का होईना कमी होणार आहे, हे मात्र नक्की. स्वेरी स्थापनेपासून शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्यात देखील नित्य योगदान देत असते. स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी महत्वाच्या वारी काळात दर्शन रांगेतील वारकऱ्यांना पाणी वाटप, निर्मल वारी, पोलीस मित्र, स्वच्छता मोहीम, औषध वाटप, आरोग्य तपासणी पथनाट्याद्वारे जनजागृती अशा विविध उपक्रमांतून सामाजिक योगदान देत आहेत. पुर्वी स्वेरीचे विद्यार्थी या सेवेत अधिक सहभागी असायचे. त्यात यंदा पासून भर पडली असून प्राध्यापक देखील या सेवाभावी कार्यात झोकून देत आहेत. यामुळे स्वेरीच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या नियोजनात्मक मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार यांच्या नेतृत्वाखाली, बी. फार्मसीचे प्रभारी प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, विद्यार्थी अधिष्ठाता व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश मठपती व डॉ. सुभाष जाधव यांच्या सहकार्याने स्वेरी अंतर्गत असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (डिग्री), कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (डिप्लोमा), डी.फार्मसी व बी.फार्मसी या चार महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी या सेवेत सहभागी झाले आहेत.