स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूरच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या
अध्यक्षपदी गुरुप्रसाद तेलकर आणि उपाध्यक्षपदी दत्तात्रय घोडके यांची निवड
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या नूतन अध्यक्षपदी गुरुप्रसाद तेलकर आणि नूतन उपाध्यक्षपदी दत्तात्रय घोडके यांची निवड झाल्याची माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगची माजी विद्यार्थी संघटना ही सातत्याने आजी आणि माजी विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्य करत असते. माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानातील चालू घडामोडी, परदेशात असलेल्या उच्च शिक्षणाच्या संधी, स्पर्धा परीक्षा, औद्योगिक जगातील तांत्रिक घडामोडी, आणि अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर ज्या ज्या नामांकित कंपन्यांमध्ये स्वेरी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी कार्यरत आहेत अशा ठिकाणी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नोकरी करण्याची संधी मिळावी म्हणून स्वेरीचे माजी विद्यार्थी नेहमीच प्रयत्नशील असतात. या माजी विद्यार्थ्यांच्या उदात्त कार्यामुळे स्वेरीच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाला भरपूर मदत होते. त्याचबरोबर माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून महाविद्यालयातील संशोधन कार्याला अधिक चालना मिळावी म्हणून दरवर्षी संशोधन निधी दिला जातो. त्याचबरोबर महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या मल्टीपर्पज बिल्डिंग साठी आणि ट्रेनिंग आणि प्लेसमेंटच्या विभागाच्या आधुनिकीकरणासाठी पंचवीस लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले असून त्यातील पंधरा लाख रुपयांचा निधी महाविद्यालयाला पूर्वीच दिला आहे. विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळावे यासाठी प्रेरणा म्हणून माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सुवर्णपदक दिले जाते. अशा या उपक्रमशील व कृतिशील माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी गुरुप्रसाद प्रकाश तेलकर आणि उपाध्यक्षपदी दत्तात्रय सुखदेव घोडके यांची निवड करण्यात आलेली आहे. तर संघटनेच्या कार्यकारणी सदस्यांमध्ये प्रवीण श्याम वेळापूरकर, प्रा.यशपाल मारुतीराव खेडकर, सौ.वनिता ज्ञानदेव जाधव, अभिजीत तुकाराम नवले हे कार्यरत आहेत. तसेच स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूरचे प्राचार्य या नात्याने डॉ.बी.पी.रोंगे हे देखील या कार्यकारणी मध्ये सदस्य आहेत. महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.अविनाश अनिल मोटे यांचा पदसिद्ध सचिव म्हणून या संघटनेच्या कार्यकारणी मध्ये समावेश आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले आहे.