प्राध्यापकांनी स्वतः ला अद्ययावत ठेवणे आवश्यक
- स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे
स्वेरीमध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम संपन्न
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग व बेंगलोरच्या कॉमसोल मल्टिफिजिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने ‘न्यूमरिकल सिम्युलेशन अँड ऍनालिसीस विथ कॉमसोल मल्टिफिजिक्स’ हा एक आठवड्याचा ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम संपन्न झाला.
दि.१३ जून ते १८ जून दरम्यान हा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम पार पडला. ‘जगभरातील तंत्रज्ञानाच्या बदलत्या प्रवाहानुसार महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग हा अद्ययावत असणे, ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी अशा प्राध्यापक विकास कार्यक्रमांची अत्यंत गरज असते.’ असे प्रतिपादन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी केले. इंजिनिअरिंग क्षेत्रातील प्रगतीसाठी व त्यातील संशोधनासाठी न्यूमरिकल सिम्युलेशन अँड ऍनालिसिस या तंत्राचा वापर संशोधक व प्राध्यापक यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या विकास कार्यक्रमाचा उपयोग झाला. सदर विकास कार्यक्रमासाठी कॉमसोल मल्टिफिजिक्स प्रा. लि. चे डॉ. अंटीज मार्टिन, प्रवल जैन, डॉ. राहुल भट व डॉ. उत्कर्ष छिब्बर या तज्ञांचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. हकीम नियास (एनर्जी इन्स्टिटय़ूट, हैदराबाद), अली दाऊद अलहोसेनी (इराण), काझेम अडवी (कॅनडा), डॉ.भास्कर कोप्पोलू (कॅन्सास, अमेरिका), डॉ.रणजीत गिड्डे व प्रा. दिग्विजय रोंगे या तज्ञ संशोधकांनी त्यांचे संशोधन आणि त्यासाठी कॉमसोलचा झालेला फायदा याची सविस्तर माहीती दिली. अमेरिकेचे डॉ. भार्गव कोप्पोलु यांनी स्वेरी मधील या स्तुत्य कार्यक्रमाची प्रशंसा केली. ते म्हणाले की, 'ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी या कार्यक्रमाचा फायदा होईल व स्वेरीचे विद्यार्थी देश-विदेशात आपले नाव चमकवतील.' या विकास कार्यक्रमामध्ये देशभरातून विविध राज्यातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक व औद्योगिक क्षेत्रातील संशोधक सहभागी झाले होते. या विकास कार्यक्रमाचे उदघाटन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, संस्थेचे विश्वस्थ प्रा.सुरज रोंगे, कॅम्पस इन्चार्ज, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार आणि मेकॅनिकल इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले. प्रा.संदीपराज साळुंखे, प्रा.दिग्विजय रोंगे, प्रा.सचिन काळे, प्रा. अविनाश पारखे, प्रा. दिगंबर काशीद आदींनी या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहिले. तांत्रिक व्यवस्थापन बालाजी सुरवसे यांनी केले तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.