स्वेरी अभियांत्रिकीत ‘पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताह’ संपन्न
पंढरपूर- ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या पार्श्वभूमीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये ‘पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले होते. सलग सात दिवस स्वेरी कॅम्पस, पंढरपूर शहर व इतर ठिकाणी पर्यावरण पूरक व स्वच्छते संबंधी विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांसाठी स्वेरीतील प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी जरी परिश्रम केले असले तरी नागरिकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे खऱ्या अर्थाने ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा झाला.
संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली दि.०७ जून २०२२ पासून ते दि.१३ जून २०२२ पर्यंत ‘पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताह’ राबविण्यात आला. यामध्ये स्वच्छतेचे महत्व, निसर्गाची व पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी प्लॅस्टिक प्रतिबंध, पाण्याचा योग्य वापर करून अतिरिक्त पाणी साठवून ठेवले पाहिजे व त्याचा योग्य वापर केला पाहिजे यासाठी मार्गदर्शन व भित्तीपत्रकाद्वारे विविध घोषवाक्ये तयार करून त्यांचा प्रसार व प्रचार करून विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे व स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे ‘निसर्गाचा समतोल कसा राखायचा? हे अभिनयातून व उत्तम सादरीकरणातून पटवून दिले. यासाठी त्यांनी विविध ठिकाणी जावून स्वच्छता करून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. त्यात बेगमपूर किल्ला, एसटी स्टँड, श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, चंद्रभागा नदी, प्रदक्षिणा मार्ग, गोपाळपुरातील प्राथमिक आरोग्य केंद्र, स्वेरी कॅम्पस, वसतिगृह परिसर या ठिकाणी प्रत्यक्ष जावून स्वच्छता केली. हा सप्ताह यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.सुभाष जाधव यांच्यासह इतर प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. सलग सात दिवस प्राध्यापकांनी व राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेतली त्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या टीमचे अभिनंदन केले आहे.