खरा स्वातंत्र्य लढा डॉ. आंबेडकरांनी दिला - विचारवंत व पत्रकार दत्ता थोरे स्वेरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

 खरा स्वातंत्र्य लढा डॉ. आंबेडकरांनी दिला - विचारवंत व पत्रकार दत्ता थोरे


स्वेरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी



पंढरपूर– ‘भारतरत्न डॉ.आंबेडकर यांचे वेगळेपण पाहिले तर राज्यघटना आणि दलितांसाठी कार्य याच्या पलीकडे आम्हाला फार जास्त काही माहित नाही परंतु डॉ. आंबेडकरांचे विचार व जीवनकार्य हे सर्व स्तरातील नागरिकांना अधिकार प्राप्त करून देणारे आहेत. डॉ. आंबेडकर हे एक अर्थशास्त्रज्ञ, तत्वज्ञ, विचारवंत व कायदेपंडित होते. आज आपल्या देशासोबतच इतर देश देखील त्यांच्या अर्थशास्त्रीय तत्वांनुसार चालतात. आज १४५ हून अधिक देशात डॉ.आंबेडकरांचे पुतळे आहेत आणि त्यांना तेथे आदर्श मानले जाते. आपल्या देशातही प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावांमध्ये डॉ.आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. फक्त शाळा-संघटना यांचा विचार केला तर सर्वात जास्त शाळांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आलेले आहे. गुलामगिरीत वावरणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाला त्यांचा हक्क मिळवून देण्याचे महान कार्य डॉ. आंबेडकरांनी केले. भारतीय महिलांनाही संस्कृतीने घालून दिलेल्या मर्यादांची जाणीव करून देऊन त्यांना अन्यायापासून मुक्त केले. आज भारतात प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांप्रमाणेच कार्य करत आहेत. ज्ञानसूर्य, प्रज्ञासूर्य, ज्ञान वैद्य, मजूर मंत्री, ज्ञान यात्री, संसदपटू, उच्च विद्याविभूषित, बोधिसत्व, युगपुरुष, कायदा मंत्री, कायदेपंडित, परमपूज्य, विश्वरत्न अशा अनेक शब्दांनी त्यांचा गौरव केला जातो. ‘शिका, संघटीत व्हा, आणि संघर्ष करा’ या त्रिसूत्रीच्या माध्यमातून त्यांनी आपला समाज शिक्षित झाला पाहिजे यासाठी महान कार्य केले. एकूणच पारतंत्र्यातील लढा आणि त्यासोबतच पाच हजार वर्षांपूर्वीपासून भारतीय समाजात रुजलेली असमानता यांच्याविरोधात डॉ. आंबेडकर यांनी खऱ्या अर्थाने मोठा स्वातंत्र्य लढा दिला.’ असे प्रतिपादन विचारवंत व पत्रकार दत्ता थोरे यांनी केले.

           स्वेरीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३१ व्या जयंती निमित्त 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन कार्य’ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून विचारवंत व पत्रकार दत्ता थोरे मार्गदर्शन करत होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे माजी संचालक डॉ. भगवानराव अधटराव हे विशेष अतिथी म्हणून लाभले होते. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनानंतर स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करून डॉ.आंबेडकरांच्या कार्यावर प्रकाश टाकला आणि ‘पारतंत्र्यातील भारत देश आणि भारतीय समाजातील वेगळी मानसिकता ही आपल्या समाजातील घटकाला माणूस म्हणून सुद्धा विचारात न घेण्याची मानसिकता, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही अशा भावनेने अन्याय एकीकडे होतोय तर दुसरीकडे अन्याय सहन करण्याची मानसिकता आणि यातून एका रत्नाचा जन्म होतो व ते पुढे भारतातीलच नव्हे तर विश्वात आदर्श ठरतात, त्याचं नाव म्हणजे भारतरत्न, विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे होय. डॉ.आंबेडकर यांनी समाजासाठी प्रचंड संघर्ष करून भारतीय समाजासाठी भरीव कार्य केले. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या त्रिसुत्रांची शिकवण त्यांनी भारतीयांना दिली.’ असे सांगून डॉ. आंबेडकरांच्या जीवन पटावर प्रकाश टाकला. विशेष अतिथी डॉ. अधटराव म्हणाले की, ‘माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. या संस्कृतीतून बाहेर पडून समाजाला एक वेगळा विचार डॉ. आंबेडकरांनी दिला, वेगळी दिशा दिली. असे थोर महामानव डॉ.आंबेडकर यांचा विचार एका दिवसाचा नसून आयुष्यभराचा विचार आहे. असे सांगून ‘भारतीय संविधान’ या पवित्र ग्रंथातून माणूस कसा असावा, व त्याचबरोबर डॉ. आंबेडकर यांच्या ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’ या सूत्रांचा सविस्तर अर्थ सांगितला. पत्रकार थोरे पुढे म्हणाले कि, 'समाजातील वंचितांसाठी डॉ. आंबेडकरांचे कार्य महान होते. स्त्रिया, दलित, अल्पसंख्याक हे समाजाचे जे अस्थिर घटक आहेत त्यांच्यासाठी स्वातंत्र्य, समता व बंधुता निर्माण करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी भरीव योगदान दिले. त्यांचे विचार दूरदर्शी होते. त्यांची अफाट बुद्धिमत्ता पाहून त्यांना विश्वात अर्थतज्ञ, घटनातज्ज्ञ, पत्रकार, कायदेपंडित, कायदामित्र, तत्वज्ञ अशा अनेक बिरुदावल्या लावल्या जातात. डॉ.आंबेडकर यांनी आपले आयुष्य अस्पृश्य समाजाच्या वेदनांना वाचा फोडण्यासाठी वेचले. महिलांना स्वातंत्र्य देणारे विधायक, हिंदू कोड बिल, सातबारा नोंदी, मतदानाचा अधिकार, घटस्फोट, महिलांचे अधिकार, नोकरी करण्याचा अधिकार आदीं बाबत डॉ.आंबेडकरांनी स्त्री-पुरुषांना समानतेचा अधिकार दिला. डॉ.आंबेडकरांच्या विचारांचा, राज्यघटनेचा आज इतर देशात देखील पुरस्कार केला जातो.' असे सांगून थोरे यांनी दलित उद्धाराच्या कार्यावर प्रकाश टाकून डॉ. आंबेडकर यांचे वेगळेपण सांगताना म्हणाले कि, ‘ज्या वयात समाजाची पूर्ण जाणीव पण नसते त्या वयात डॉ. आंबेडकर हे राष्ट्राचा विचार करणारे महामानव म्हणून ओळखले गेले.’ या जयंतीचे औचित्य साधून पाहुण्यांच्या हस्ते ‘स्वेरीयन’ च्या बत्तीसाव्या अंकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी डॉ. नितिन भराटे, शशिकांत कराळे, यांच्यासह स्वेरी अंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad