कोणतेही काम आवडीने केल्यास मनावर ताण येत नाही - हिप्नॉथेरपीष्ट डॉ. क्रांतीदीप लोंढे


कोणतेही काम आवडीने केल्यास मनावर ताण येत नाही  

                                                              - हिप्नॉथेरपीष्ट डॉ. क्रांतीदीप लोंढे



स्वेरीत ‘स्ट्रेस मॅनेंजमेंट’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न 


पंढरपूर- ‘मनामध्ये आळसाने स्थान निर्माण केल्यामुळे आज आणि आत्ता होणारे काम आपण सहजपणे पुढे ढकलतो. त्यामुळे नियमीत होणारी कामे अपूर्णच राहिल्यामुळे पुढे मग कामे वाढतात आणि त्यातून ताण-तणाव निर्माण होतो. साहजिकच चिडचीड, निद्रानाश, निराशा अशा विविध व्याधींना आपण बळी पडतो. एकूणच आपणच आपले ताण वाढवून घेत असतो. त्यामुळे पुढे आपण जे ठरवतो ते होईलच, असे सांगता येत नाही. यासाठी आपण कामाशी एकाग्र असणे आवश्यक आहे. आपण आपल्या मनावर ताबा मिळवणे आवश्यक आहे. आपण कार्य करत असताना आपल्या मनावर टेन्शन येतं, प्रेशर येतं, कामे व्यवस्थित होत नाहीत याचे कारण म्हणजे आपण पाठीमागच्या पिढीच्या चुकीच्या विचारांचे गुलाम बनलेले असतो. त्यामुळे आपण प्रत्येक काम उद्यावर ढकलतो. ज्यावेळी मन सकारात्मक दृष्टीने काम करते, तेंव्हा सर्व कार्य सुरळीत आणि यशस्वी होते यासाठी आपण जे कार्य हाती घेता त्यात सर्वप्रथम आवड निर्माण करा. कोणतेही काम आवडीने केल्यास मनावर फारसा ताण येत नाही.’ असे प्रतिपादन आयुष हिप्नॉथेरपी अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे हिप्नॉथेरपीष्ट डॉ. क्रांतीदीप लोंढे यांनी केले. 

         स्वेरीमध्ये आयोजिलेल्या एक दिवसीय ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’ वरील या कार्यशाळेमध्ये हिप्नॉथेरपीष्ट डॉ. क्रांतीदीप लोंढे हे ‘मनावरील ताण तणाव’ दूर करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करत होते. दोन सत्रात आयोजिलेल्या या कार्यशाळेत स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. प्रास्ताविकात डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी ही कार्यशाळा आयोजित करण्यामागचा हेतू स्पष्ट केला. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे म्हणाले की, 'निर्मळ मनाने आपण अशा कार्यशाळांमध्ये सामील झालो आणि त्यांच्या सांगण्यानुसार बदल केले तर त्याचे भविष्यात चांगले फायदे दिसून येतात. याउलट प्रेशर, ताण तणावात कार्य केल्यास तोटा होण्याचा संभव अधिक असतो. मी विद्यार्थी दशेत असताना ‘स्ट्रेस मॅनेंजमेंट’ या विषयावर वेगवेगळ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्याची संधी घेतली. त्यामुळे आज एकाच वेळी वेगवेगळ्या कार्यामध्ये एकाग्रता येते आणि कोणताही ताण तणाव येत नाही. एकूणच मला जडणघडणीमध्ये अशा कार्यशाळांचा फायदा होत आहे. जर निर्मळ मनाने न्यूट्रल गिअर टाकून अशा प्रोग्राममध्ये आपण सहभागी झालात तर भविष्यात आपल्या स्वभावात बदल होऊ शकतो. ‘ काहीही केल्यास स्वभाव बदलत नाही’ असे आपण नेहमी ऐकतो परंतु माझ्या मते हे म्हणणे सार्थ चुकीचे आहे कारण स्वभावात बदल हा एक दिवसात होत नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक काही बदल करावे लागतात. प्रथम स्वतःमध्ये बदल करण्याची मानसिकता तयार करावी लागते. त्यामुळे अशा कार्यशाळांमधून स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि जर तो बदलला तर आपण सहज विश्व जिंकू शकतो.’ असे सांगून डॉ. रोंगे यांनी येणारा ताण कसा दूर करावा, याबाबत थोडक्यात विवेचन केले. पुढे डॉ. लोंढे यांनी हिप्नॉटिझम म्हणजे काय, गॅमा, बीटा, अल्फा, थिटा आणि डेल्टा या मनाच्या अवस्था कशाप्रकारे मनावर ताबा घेतात हे सांगितले. विचार, मन, बुद्धी आणि शरीर यांचे परस्परांशी संबंध असून ते नेमके कार्य कसे करतात हे त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे पटवून दिले. यावेळी त्यांनी काही प्राध्यापक आणि काही प्राध्यापिका यांना स्टेजवर बोलावून घेतले आणि त्यांच्याकडून हिप्नॉटिझमच्या सहाय्याने एकाग्रता कशी साध्य करायची हे प्रात्यक्षिकाद्वारे सांगितले. पुढे डॉ. लोंढे म्हणाले कि, ‘ज्यावेळी माणूस सकारात्मक होतो, त्या दृष्टीने काम करतो तेंव्हा सर्व कार्य सुरळीत व यशस्वी होते. यासाठी आपल्या अंतर्मनाशी सुसंवाद साधण्याची गरज आहे. यासाठी आपण जे काम करतो त्यात आवड निर्माण करण्याची गरज आहे आणि आवड निर्माण केली की कामामध्ये यशस्वी होता येते. यासाठी आपल्या मनावर आपला ताबा ठेवून अंतर्मनाशी सुसंवाद साधावा. यामुळे नकारात्मक विचारामधून सकारात्मक विचार करण्याची क्षमता येते आणि मनावर कोणत्याही प्रकारे ताण येत नाही. दिवसभर आपण उत्साही राहू शकतो.’ असेही डॉ. लोंढे यांनी सांगितले. यावेळी सचिन मोरे, डॉ. मनोज निथळीकर, राहूल चव्हाण, राकेश चव्हाण संस्थेचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे यांच्यासह चारही महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. प्रशासन अधिष्ठाता डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad