*सिंहगड अकॅडमी पंढरपूर येथे ओरिएंटेशन प्रोग्राम व गुणवंतांचा सत्कार समारंभ संपन्न*
पंढरपूर: सिंहगड अकॅडमी, पंढरपूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील इयत्ता ११वीच्या विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन प्रोग्राम (माहिती सत्र) अत्यंत उत्साहात पार पडला. यासोबतच, इयत्ता १०वीच्या बोर्ड परीक्षेत दैदीप्यमान यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला, अशी माहिती कॅम्पस डायरेक्टर डॉ कैलाश करांडे यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य प्रशांत पाटील लाभले होते. उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर कॅम्पस डायरेक्टर डॉ. के. जे. करांडे यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला.
अकॅडमीचे प्रमुख डॉ. एस. जी. देशमुख यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून अकॅडमीचे शैक्षणिक नियोजन, परीक्षा पद्धती, तसेच जेईई (JEE), नीट (NEET) व एमएच-सीईटी (MH-CET) परीक्षांचे सविस्तर मार्गदर्शन केले. सोबतच संस्थेतील शिस्त आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक सुविधांची माहिती पालकांना दिली. तसेच, पालक प्रतिनिधी श्री. शेंडगे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे प्राचार्य प्रशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन आणि उज्ज्वल भविष्यासाठीचे महत्त्वाचे कानमंत्र दिले. तसेच डॉ. के. जे. करांडे यांनी केलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या आगामी शैक्षणिक वाटचालीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. या यशोत्सवामुळे उपस्थित विद्यार्थी आणि पालकांमध्ये अत्यंत आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सायली जाधव यांनी केले, तर प्रा. विठ्ठल बोचरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयआयटी (IIT) कानपुर मधून शिक्षण घेतलेले डॉ. प्रदीप साचन, प्रा. मोहम्मद डॅनिश (उत्तराखंड), व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

