*पंढरपूर सिंहगडमध्ये "फ्रॉम अल्गोरिदम्स टू इनोव्हेशन्स : द जर्नी ऑफ एआय" या विषयावर व्याख्यान*
पंढरपूर : प्रतिनिधी
एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग व इनोव्हेशन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली "फ्रॉम अल्गोरिदम्स टू इनोव्हेशन्स : द जर्नी ऑफ एआय" या विषयावर दिनांक १८ जुलै २०२६ रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्तेतील आधुनिक घडामोडी आणि भविष्यातील संधी यांविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती देणारे हे व्याख्यान उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरीत्या संपन्न झाल्याची माहिती विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली.
या व्याख्यानासाठी श्री. नानासो सुखदेव बनसोडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) या तंत्रज्ञानाचा विकास, त्यामागील मूलभूत अल्गोरिदम्स, तसेच विविध उद्योगांमध्ये एआयच्या वाढत्या आणि नाविन्यपूर्ण वापराविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. आरोग्य, शिक्षण, कृषी, उत्पादन, वित्तीय सेवा आणि स्मार्ट तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये एआयमुळे घडत असलेल्या परिवर्तनाची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना उदाहरणांसह दिली. तसेच भविष्यातील रोजगाराच्या संधी, आवश्यक कौशल्ये आणि संशोधनातील नव्या दिशा यांवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी प्रेरित केले.
या व्याख्यानास इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा. सोनाली गोडसे व प्रा. स्वप्निल टाकळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विभागातील सर्व प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

