नागेश फाटे यांच्या २० वर्षांच्या सामाजिक व राजकीय संघर्ष प्रवासाचे संचित ग्रंथरूपात; पवार साहेबांकडून कौतुक व शुभेच्छा.
पंढरपूर प्रतिनिधी
गेल्या दोन दशकांपासून जनसेवेचा वसा घेऊन सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणारे खंबीर नेतृत्व नागेश फाटे यांच्या वीस वर्षांच्या संघर्षमय प्रवासाची गाथा आता ग्रंथरूपात रसिकांसमोर येत आहे. त्यांच्या या प्रवासाचे संचित असलेल्या "दिंडी विकासाची" या पुस्तकाची पहिली प्रकाशनपूर्व प्रत नुकतीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांना सदिच्छा भेट म्हणून दिली. साहेबांनी अत्यंत आपुलकीने या पुस्तकाची प्रत स्वीकारत नागेश फाटे यांच्या कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
एका सामान्य कार्यकर्त्यापासून सुरू झालेला प्रवास, जनसेवेची अविरत वीस वर्षे, असंख्य माणसांची जोडलेली साखळी, आलेले समृद्ध अनुभव, केलेला संघर्ष आणि मतदारसंघाच्या व समाजाच्या विकासाची पाहिलेली स्वप्ने या सर्व आठवणींचा आणि वाटचालीचा वेध "दिंडी विकासाची" या पुस्तकात अत्यंत प्रभावीपणे घेण्यात आला आहे.
या भावुक आणि ऐतिहासिक क्षणाविषयी बोलताना नागेश फाटे म्हणाले की, "वीस वर्षांपूर्वी सुरू झालेला माझा प्रवास आज एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. पवार साहेबांसारख्या नेतृत्वाकडे माझ्या कार्याची नोंद असलेल्या प्रकाशनपूर्व पुस्तकाची पहिली प्रत पोहोचणे, ही माझ्यासाठी केवळ अभिमानाची नव्हे, तर कृतज्ञतेची भावना आहे. साहेबांच्या हाती ही प्रत सुपूर्द करताना जुन्या अनेक आठवणी मनात दाटून आल्या. हा क्षण माझ्यासाठी आयुष्यभराची ऊर्जा आणि प्रेरणा देणारा आहे."

