*"विद्यार्थ्यांनी स्टार्टअप कसे सुरु करावे” या विषयावर कार्यशाळा संपन्न*
□ पुणे येथील व्हेंचर सेंटर मध्ये कार्यशाळा: फॅबटेक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयातील सर्व विभागातील द्वितीय व तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची पुणे येथे ९ जुन २०२५ रोजी एनसीएल इनोव्हेशन पार्कमधील “व्हेन्चुअर सेंटर” मध्ये “स्टार्टअप कसे सुरु करावे” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. मुग्धा लेले यांनी मार्गदर्शन केले तर व्हेंचर सेंटरचे वेदांग पवार यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप बाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांना त्यांचे नाविन्यपूर्ण विचार व्यवसायात कसे रूपांतरित करता येतील. याची माहिती देणे हे होते. सहभागी विद्यार्थ्यांना “उद्योजक बनून स्वतःचे उत्पादन किंवा सेवा कशी विकसित करावी”, “स्टार्टअप कसे स्थापन करावे व संस्थापक कसे बनावे”, तसेच “व्हेंचर सेंटर स्टार्टअपसाठी कोणत्या प्रकारे सहाय्य करू शकते” याविषयी सखोल माहिती देण्यात आली.
याशिवाय सरकारकडून उद्योजकांसाठी उपलब्ध योजनांची माहिती देखील विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना दोन स्टार्टअप उद्योजकांनी देखील प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. सहभागी विद्यार्थ्यांना स्टार्टअप उद्योजकांशी संवाद साधून त्यांच्या अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली.
कार्यशाळेअंतर्गत विद्यार्थ्यांना उच्च-तंत्र उपकरणांची थेट प्रात्यक्षिके पाहण्याची संधी मिळाली तसेच वैज्ञानिक सुविधा अनुभवता आल्या.
या कार्यशाळा फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड रिसर्च, सांगोला मधील २४ विद्यार्थ्यांनी विविध शाखांमधून उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून माहिती घेतली.
ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी स्टार्टअपच्या दिशेने एक मार्गदर्शक ठरली असून भविष्यातील उद्योजक घडवण्यास नक्कीच उपयुक्त ठरेल. ही कार्यशाळा उद्योजकता क्लबच्या अंतर्गत आयोजित करण्यात आली होती
ही कार्यशाळा हा कार्यक्रम फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे, उप-प्राचार्यि डाॅ. विद्याराणी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. जय गावडे व प्रा. स्नेहल पवार यांनी डॉ. मुग्धा लेले व वेदांग पवार यांचे अभिनंदन करत आभार मानले.

