स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाची आणखी एक ऐतिहासिक भरारी!
'ट्रिपल ए' मानांकनामध्ये सर्वोच्च 'ए प्लस प्लस' श्रेणी!
पंढरपूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामार्फत स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या
शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन शैक्षणिक व प्रशासकीय लेखापरीक्षणात स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) ला ६०० पैकी तब्बल ५८८ गुण (९८%) देत सर्वोच्च 'ए प्लस प्लस' श्रेणी प्रदान केली आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ अंतर्गत विद्यापीठाच्या समितीने महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, संशोधन व नवोपक्रम, विद्यार्थी विकास, उद्योग-संस्था सहकार्य, प्रशासन, वित्तीय व्यवस्थापन, सामाजिक बांधिलकी तसेच पायाभूत सुविधांचे सखोल मूल्यमापन करून हा मानाचा दर्जा प्रदान केला आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्यापीठामार्फत महाविद्यालयास 'ट्रिपल ए' चे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले असून ही मान्यता नोव्हेंबर २०२८ पर्यंत वैध राहणार आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधनाभिमुख वातावरण, उद्योगाभिमुख उपक्रम, अत्याधुनिक सुविधा आणि प्रभावी प्रशासन यांच्या बळावर स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्टतेची विद्यापीठ स्तरावर ठळक नोंद करून दिली आहे.
या लेखापरीक्षणामध्ये अभ्यासक्रम नियोजन व प्रभावी अंमलबजावणी, शैक्षणिक दिनदर्शिकेचे काटेकोर पालन, माहिती तंत्रज्ञान आधारित अध्यापन, आऊटकम बेस्ड एज्युकेशन, विद्यार्थी-केंद्रित अध्यापन पद्धती, एनपीटीइएल/ स्वयम मध्ये विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग, इंटर्नशिप, उद्योगाभिमुख प्रकल्प, विद्यार्थी समाधान सर्वेक्षण, पालक व उद्योगक्षेत्राचा अभिप्राय, विद्यार्थी-मार्गदर्शन प्रणाली, उत्कृष्ट निकाल या बाबींचे मूल्यमापन करण्यात आले. महाविद्यालयाने या सर्व निकषांमध्ये उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे.
संशोधन व नवोपक्रम क्षेत्रात एससीआय व स्कोपस संशोधन प्रकाशने, संशोधन प्रकल्पांसाठी प्राप्त निधी, पीएच.डी. मार्गदर्शक असणारे प्राध्यापक, पेटंट्स, अविष्कार स्पर्धेतील यश, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमधील सहभाग, उद्योग व शैक्षणिक संस्थांसोबतचे सामंजस्य करार, संशोधन सहकार्य आणि विस्तार उपक्रम या सर्व बाबींचे मूल्यांकन करण्यात आले.
विद्यार्थी विकासाच्या दृष्टीने उत्कृष्ट प्लेसमेंट, करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम, अभ्यास दौरे, तज्ज्ञ व्याख्याने, एन.एस.एस. उपक्रम, तांत्रिक स्पर्धांमधील सहभाग व पारितोषिके, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील यश, उद्योजकता विकास आणि माजी विद्यार्थ्यांचे योगदान या सर्व बाबी संस्थेच्या सर्वांगीण विकासाच्या प्रतीक ठरल्या.
उत्तम प्रशासन, व्यवस्थापन व पायाभूत सुविधांमध्ये एआयसीटीई मानकांनुसार पात्र व पीएच.डी. धारक प्राध्यापक वर्ग, डिजिटल प्रशासन, नॅक आणि एनबीए गुणवत्ता उपक्रम, अत्याधुनिक प्रयोगशाळा, स्मार्ट वर्गखोल्या, ई-लर्निंग सुविधा, समृद्ध ग्रंथालय, संशोधन प्रयोगशाळा, उच्च गतीयुक्त इंटरनेट, स्वतंत्र वसतिगृहे, क्रीडा सुविधा, दिव्यांग अनुकूल परिसर, सुरक्षा व्यवस्था आणि विद्यार्थी-केंद्रित सुविधा उपलब्ध असल्याची समितीने नोंद घेतली.
स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाला प्राप्त झालेली 'ए प्लस प्लस' श्रेणी ही केवळ गुणवत्तेची मान्यता नसून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण देण्याच्या संस्थेच्या वचनबद्धतेचा गौरव आहे. संस्थेचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, गुणवत्तापूर्ण शिक्षणाविषयीची दृढ बांधिलकी आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे हे अभूतपूर्व यश संपादन झाले आहे. संस्थेचे सचिव डॉ. सूरज रोंगे यांचे गतिमान नेतृत्व, कॅम्पस इन्चार्ज डॉ. मुकुंद पवार यांचे समन्वयात्मक नेतृत्व, उपप्राचार्या डॉ. सौ. मिनाक्षी पवार यांचे प्रभावी शैक्षणिक मार्गदर्शन, तसेच आयक्यूएसी समन्वयक व 'ट्रिपल ए' चे प्रमुख समन्वयक डॉ. संदीप वांगीकर यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले आहे. यासोबतच सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी तसेच उद्योग क्षेत्रातील सहकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्न, समर्पण आणि उत्कृष्टतेच्या ध्यासामुळे स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाने हे यश संपादन केलेले आहे. गुणवत्ता, संशोधन, नवोपक्रम, उद्योगाभिमुख शिक्षण, परिणामाधिष्ठित अध्यापन, प्रभावी प्रशासन आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधांचा उत्कृष्ट समन्वय साधत संस्थेने गुणवत्तेचा हा नवा आदर्श निर्माण केला आहे. हे यश संपूर्ण स्वेरी परिवारासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. मांडवे, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, इतर अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी सर्वांचे अभिनंदन केले.
चौकट:
स्वेरीच्या स्थापनेपासून आजपर्यंत 'ट्रिपलपीई' अर्थात 'पंढरपूर पॅटर्न इन प्रोफेशनल एज्युकेशन' च्या माध्यमातून व संस्थापक डॉ. बी.पी.रोंगे (सर) यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यात आलेले आहेत. अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांचा एकत्रित परिणाम म्हणजे स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयास मिळालेली ही सर्वोच्च 'ए प्लस प्लस' श्रेणी होय.

