स्वेरी मध्ये केंद्र शासनाच्या सीटूएस स्कीम मधून ईडीए व अल्टीयम ही अद्ययावत डिझाईन सॉफ्टवेअर्स उपलब्ध


स्वेरी मध्ये केंद्र शासनाच्या सीटूएस स्कीम मधून ईडीए व अल्टीयम ही अद्ययावत डिझाईन सॉफ्टवेअर्स उपलब्ध



पंढरपूर: इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY), भारत सरकारने अलीकडच्या काळात विशेष मनुष्यबळ विकास कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत देशाची व्ही. एल. एस. आय. व एम्बेडेड डिझाइन क्षेत्रातील क्षमता वाढवून इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जागतिक पातळीवर आपले अस्तित्व निर्माण करण्याचे भारताचे ध्येय आहे. त्या अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने नॅशनल पॉलिसी ऑन इलेक्ट्रॉनिक्स (एन.पी.ई.) २०१९ हे राष्ट्रीय धोरण सादर केले. चिपसेट सारखे आवश्यक घटक विकसित करणे आणि या उद्योगाला जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवणे हा या धोरणाचा उद्देश आहे. त्यासाठी शासन स्तरावरून विविध शैक्षणिक संस्था, उद्योग, संशोधन केंद्रे व इतर संस्थांशी करार करून सदर सुविधा उपलब्ध करून देण्याचे धोरण आखले आहे. याचाच एक भाग म्हणून बेंगलोर येथील सी-डॅक सोबत स्वेरीने सामंजस्य करार प्रस्थापित करून स्वेरी मध्ये सीटूएस स्कीम मधून ईडीए हे अद्ययावत डिझाईन सॉफ्टवेअर उपलब्ध करून घेण्यात यश मिळवले आहे.

            स्वेरीने सदर अद्ययावत सॉफ्टवेअर्स स्वेरीमध्ये उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने जुलै २०२४ मध्ये प्रस्ताव सादर केलेला होता. सुमारे एक कोटी पेक्षा जास्त एवढी मूळ किंमत असलेली ही अद्ययावत सॉफ्टवेअर्स स्वेरीला आता उपलब्ध झालेली आहेत. सीटूएस हे ‘चीप टू स्टार्ट अप’ चे संक्षिप्त रूप असून या स्कीमच्या माध्यमातून ईडीए टूल उपलब्ध झाले आहे ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना (व्हीएलएसआय) व एम्बेडेड डिझाइन बाबत अद्ययावत माहिती मिळते तसेच विद्यार्थी असे चीप डिझाईन्स बनवू शकतात. आजच्या युगात मोबाईल, टी.व्ही., लॅपटॉप अशा विविध उपकरणांमध्ये अशा चिप्स वापरल्या जातात. स्वेरी मध्ये पदवी, पदव्युत्तर अथवा पीएच.डी. चे शिक्षण घेणाऱ्या इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन इंजिनिअरींग तसेच आंतरविद्याशाखीय संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रोजेक्ट्स मध्ये या सुविधांचा लाभ होणार आहे. सिनोप्सीस व कॅडेन्स या कॅलीफोर्निया (अमेरिका) मधील बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून ही ईडीए सॉफ्टवेअर्स पुरवण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील जवळपास १२ महाविद्यालयांमध्ये अशी सुविधा उपलब्ध असून स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर (ऑटोनॉमस) हे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय आहे. 

   अल्टीयम हे मूळ ऑस्ट्रेलिया येथील कंपनीचे प्रिंटेड सर्किट बोर्ड अर्थात पीसीबी डिझाईन करण्यासाठी वापरले जाणारे अद्ययावत सॉफ्टवेअर आहे. पूर्वी हे सॉफ्टवेअर ‘पेड’ स्वरूपाचे असल्याने संस्थाना ते विकत घ्यावे लागायचे ज्याची किंमत वार्षिक सुमारे ९ लाख रुपये एवढी होती. स्वेरीने दाखल केलेल्या प्रस्तावांतर्गत सदर सॉफ्टवेअर स्वेरीला मोफत उपलब्ध झाले आहे. या सॉफ्टवेअरच्या एकूण दहा प्रमाणित कॉपीज स्वेरीमध्ये उपलब्ध झाल्या असून त्याद्वारे एकावेळी सुमारे दीडशे विद्यार्थी त्याचा वापर करून पीसीबी डिझाईन करू शकतात. मोबाईल, टी.व्ही., लॅपटॉप अशा विविध उपकरणांमध्ये लागणारे वन लेअर ते फोर लेअर्स चे प्रिंटेड सर्किट बोर्ड्स विद्यार्थी या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून डिझाईन करू शकतात. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार व विभागप्रमुख डॉ. सुमंत आनंद यांनी ही अद्ययावत डिझाईन सॉफ्टवेअर्स स्वेरी मध्ये उपलब्ध करून घेण्यासाठी परिश्रम घेतले. 

  संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे सर्व विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विभागप्रमुख डॉ. सुमंत आनंद, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी स्वेरीच्या या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad