स्वेरीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल - पॅट्रिक व्हेलन आयर्लंडच्या पॅट्रिक व्हेलन यांची स्वेरीच्या आयआयसीला सदिच्छा भेट


स्वेरीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल

                                                                    - पॅट्रिक व्हेलन

आयर्लंडच्या पॅट्रिक व्हेलन यांची स्वेरीच्या आयआयसीला सदिच्छा भेट



पंढरपूर- ‘स्वेरीमधील शिक्षण पद्धत, आदरयुक्त शिस्त, प्राध्यापकांकडून मिळणारे संस्कार आणि याच्या जोडीला निर्माण झालेले संशोधनाचे वातावरण या मुख्य कारणांमुळे स्वेरीमध्ये शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील लपलेली संशोधन प्रवृत्ती जागृत होत आहे. विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्राध्यापकांकडून वेळोवेळी चालना मिळते. ही बाब विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची व अनुकरणीय आहे. त्यामुळे स्वेरीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल आहे’ असे प्रतिपादन आयर्लंडचे पॅट्रिक व्हेलन यांनी केले. 

             २०१९-२० या शैक्षणिक वर्षांमध्ये स्वेरीमध्ये आयआयसी अर्थात इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलची स्थापना करण्यात आली. त्यानंतर आयआयसी च्या माध्यमातून स्टार्टअप, इनोव्हेशन आणि उद्योजकता असे विविध उपक्रम राबवून स्वेरीने आपले स्थान एआयसीटीईच्या इनोव्हेशन इन्स्टिट्यूशन सेलमध्ये उच्च स्थानी ठेवले आहे. या विविध आणि असंख्य उपक्रमाचे द्योतक म्हणून एआयसीटीईने स्वेरीच्या आयआयसीला चांगल्या रेटींगचे मानांकन दिले आहे. स्वेरीच्या या आयआयसी मध्ये विविध नामांकित कंपन्यांमधील मार्गदर्शकांची नेमणूक केलेली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून आयर्लंडचे उद्योजक व संशोधक पॅट्रिक व्हेलन यांनी स्वेरीच्या ‘इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल’ ला भेट दिली व उपक्रमांची माहिती घेऊन सर्वांचे कौतुक केले. शिक्षणतज्ञ व तंत्रशिक्षण संचालनालयाचे माजी संचालक तसेच स्वेरीच्या आयआयसीचे चेअरमन डॉ.एन.बी.पासलकर यांच्या हस्ते आयर्लंडच्या पॅट्रिक व्हेलन यांचे स्वागत करण्यात आले. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी स्वेरीची वाटचाल आणि मिळालेले यश याबाबत सांगितले. पॅट्रिक व्हेलन हे स्वेरीचे सर्व विभाग, संशोधन विभाग व विविध संशोधन प्रकल्प पाहून भारावून गेले. यापूर्वी ‘टेक्नोसोसायटल’ च्या निमित्ताने अनेक परदेशी पाहुणे, शास्त्रज्ञ, अभ्यासतज्ञ यांनी स्वेरीला भेट दिली आहे. 'स्टडी ऑफ सोलार डिप्लॉयमेंट इन पंढरपूर’ या विषयावर स्वेरीत संशोधन करण्यासाठी ‘नेहरू पुलब्राईट यु.एस. स्टुडंट रिसर्च प्रोग्राम’ च्या माध्यमातून आलेले वर्जीनिया (वॉशिंग्टन, अमेरिका) मधील झॅकरी मरहंका हे देखील परदेशी विद्यार्थी स्वेरीत गेल्या वर्षापासून आहेत. यावेळी स्वेरीच्या इनोव्हेशन कौन्सिलचे पदाधिकारी अशोक सराफ, प्रा. सुहास देशपांडे, सुदर्शन नातू, पद्माकर केळकर, अतुल मराठे, महेश वैद्य, रमेश आडवी, मधुसुदन मोटे, कमलेश पांडे व स्वेरीच्या इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलच्या समन्वयिका डॉ.व्ही.एस. क्षीरसागर यांच्यासह स्वेरीचे प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad