कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला समृद्ध केले
-साहित्यिक महादेव घोंगडे
स्वेरीमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा
पंढरपूर- 'कुसुमाग्रजांनी निर्माण केलेल्या साहित्यामध्ये एक प्रकारची वेगळी ताकद व प्रेरणा असल्यामुळे मराठी साहित्य क्षेत्रात साहित्यिक व कवी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. मानवी भावना साहित्याच्या रूपाने किती प्रकाराने फुलू शकते हे वि. वा. शिरवाडकर यांनी दाखवून दिले. म्हणून खऱ्या अर्थाने कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला समृद्ध केले.’ असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक महादेव घोंगडे यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार यांच्या सहकार्याने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीत ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी जेष्ठ साहित्यिक व सेवानिवृत्त शिक्षक महादेव घोंगडे हे मार्गदर्शन करत होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणतज्ञ डॉ. मोहन देशपांडे हे उपस्थित होते. प्रथम पाहुण्यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वेरीचे सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी प्रास्ताविकात ‘मराठी भाषा गौरव दिना’चे महत्व स्पष्ट करताना ‘कुसुमाग्रजांच्या मराठीतील साहित्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर भारताबाहेर देखील मराठी भाषेला महत्व प्राप्त झाले आहे. कुसुमाग्रजांनी आपल्या साहित्यातील लेखनातून मराठी भाषेला जागतिक स्तरावर पोहचवण्याचे कार्य केले आहे. आज मातृभाषेमुळेच भाषेची गोडी निर्माण होवून मनातील भावना अधिक उत्कटपणे व्यक्त करता येतात.’ असे सांगितले. प्रमुख अतिथी शिक्षणतज्ञ डॉ. मोहन देशपांडे म्हणाले की, ‘सध्या सर्वत्र इंग्रजी भाषेचे लोण पसरले असले तरी महाराष्ट्रात मराठी भाषेतूनच आपले विचार अधिक प्रभावीपणे प्रकट करता येतात. ग्लोबल लेवलवर काम करताना आपल्याला काही ठिकाणी मातृभाषेचा आदर हा राखलाच पाहिजे.’ असे सांगून त्यांनी कुसुमाग्रज यांनी ‘कणा’ सारख्या कवितेत असणारी लयबद्ध रचना, दुर्दम्य आशावाद याचे महत्व सांगितले. यावेळी डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मनियार, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. श्रीकृष्ण भोसले, प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.सतीश लेंडवे, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर, प्रा.राहुल नागणे, प्रा. अविनाश कोकरे, प्रा. प्राजक्ता जामदार, प्रा.प्रज्ञा होनमुटे, प्रा.चैताली अभंगराव, प्रा. सारिका हजारे, प्रा. संजय मोरे, प्रा.सचिन काळे, प्रा. सचिन खोमणे, प्रा.प्रसाद बाबर, प्रा. दीपक भोसले, इतर प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आदी उपस्थित होते. सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. नीता कुलकर्णी यांनी आभार मानले.