मिळणाऱ्या विजयापेक्षा स्पर्धेत सहभागी होणे हे अत्यंत महत्त्वाचे -प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ
स्वेरीमध्ये 'ऑलम्पस २ के२३' चा समारोप
पंढरपूर- ‘आपल्या भारत देशाला ‘सुपर पॉवर’च्या पातळीवर आणण्यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे असून यासाठी ‘ऑलम्पस’ सारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा सातत्याने होणे अत्यंत गरजेचे आहे. या स्पर्धेमुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकण्याची सुवर्णसंधी मिळते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना अधिकाधिक आव्हाने स्विकारण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. स्पर्धेमध्ये विजयी होण्यापेक्षा सहभागी होणे हे अत्यंत महत्वाचे आहे. वैयक्तिक कामगिरी ही महत्त्वाची असतेच परंतु त्यात सांघिक सादरीकरणाला देखील अधिक महत्त्व असते. ' असे प्रतिपादन स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक)चे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजिलेल्या 'ऑलम्पस २ के २३' या राष्ट्रीय स्पर्धेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. प्रारंभी ‘ऑलम्पस २ के २३’ चे विद्यार्थी खजिनदार चेतन टमटम यांनी स्पर्धेसाठी बाहेरून आलेल्या स्पर्धकांचे स्वागत केले व 'ऑलम्पस २ के २३’ ही स्पर्धा आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.एम. एस. मठपती म्हणाले की, 'ऑलम्पस’मुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान मिळवण्याच्या संधी उपलब्ध होतात. यासाठी विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धेत सहभागी होणे गरजेचे आहे.' यावेळी बारामतीतील शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मधील विशाल पानसरे यांनी आपल्या मनोगतात 'स्वेरीने आयोजिलेल्या ‘ऑलम्पस’ स्पर्धेमुळे आम्हा स्पर्धकांचा व्यक्तिमत्व विकास होण्यास तसेच आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली.’असे विचार मांडले. सोलापूर येथील श्री.सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक मधील भाग्यश्री बोरगी म्हणाल्या की, ‘स्पर्धेच्या निमित्ताने स्वेरीमधील स्टाफचे व स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाजवाब होते. सुविधा पुरविण्यात कुठेही कमतरता जाणवली नाही. कार्यक्रमाचे नियोजन उत्तम आणि अप्रतिम होते. त्यामुळेच आम्ही स्पर्धेत हिरीरीने सहभागी झालो आणि स्पर्धेचा आनंद लुटता आला. स्पर्धेचा सराव करताना स्वेरीतील विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी अप्रतिम सहकार्य केले.' या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातून सुमारे ८०० हून अधिक स्पर्धक विविध २३ स्पर्धा प्रकारात सहभागी झाले होते. या स्पर्धेत जवळपास एक लाखांची बक्षिसे, स्मृतिचिन्हे, प्रमाणपत्रे अशी बक्षिसे वितरीत केली तर रोख स्वरूपातील रक्कम विजेत्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन जमा करण्यात आली. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, ‘ऑलम्पस २ के २३’चे समन्वयक प्रा.दिगंबर काशीद, ऑलम्पसचे विविध पदाधिकारी, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी ‘ऑलम्पस २ के २३’ स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. समारोपाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी यादव व दिग्विजय बुरा या विद्यार्थ्यांनी केले तर ऑलम्पसचे विद्यार्थी उपाध्यक्ष दीपक शिंदे यांनी आभार मानले.
छायाचित्र- स्वेरीत आयोजिलेल्या ‘ऑलम्पस २के२३’ स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करताना स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ सोबत समन्वयक प्रा.दिगंबर काशीद, ऑलम्पसचे पदाधिकारी व प्राध्यापक.