स्वेरी ही शिक्षणसंस्था आता राज्यात ब्रँड झाली आहे -महिला पालक प्रतिनिधी सौ.गौरी दावले स्वेरीमध्ये पालक मेळावा संपन्न


स्वेरी ही शिक्षणसंस्था आता राज्यात ब्रँड झाली आहे

                                                                      -महिला पालक प्रतिनिधी सौ.गौरी दावले

स्वेरीमध्ये पालक मेळावा संपन्न...



पंढरपूर– ‘महाविद्यालयात आयोजित केलेल्या पालक मेळाव्यातून शिक्षक व पालक यांच्यात महत्त्वपूर्ण संवाद होतो आणि त्या संवादातून पाल्यांच्या भविष्याची जडणघडण होत असते. शिक्षणतज्ञ डॉ.बी.पी.रोंगे सरांच्या कुशल नियोजनाखाली आणि शिस्तबद्ध वातावरणात आमच्या पाल्यांच्या भविष्याचा पाया हा मजबूत होत आहे. इंजिनिअरिंगमध्ये आपला नंबर लागला की आपले करिअर उत्तम घडते हा अनेकांचा अनुभव आहे. म्हणून पालक प्राधान्याने स्वेरीची निवड करतात हा इतिहास आहे. आमच्या मुलांकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासासाठी सतत पाठपुरावा आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मुबलक सोई-सुविधाही येथे आहेत. त्यामुळे ‘स्वेरी’ कॉलेज हे आम्हा पालकांच्या पसंतीला उतरलेले आहे. स्वेरी कॉलेजमध्ये एकदा विद्यार्थी प्रथम वर्षात रुजू झाला की त्याच्या करिअरची आम्हा पालकांची चिंता मिटते. त्यामुळे ‘स्वेरी’ ही शिक्षण संस्था राज्यात ब्रँड बनली आहे.’ असे प्रतिपादन महिला पालक प्रतिनिधी सौ. गौरी दावले यांनी केले. 

          गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सिव्हील इंजिनिअरिंग व एमसीए या तीन विभागांचा एकत्रित रित्या पालक मेळावा संपन्न झाला. यावेळी सौ. गौरी दावले या पालक मेळाव्यात महिला पालक प्रतिनिधी म्हणून आपले मनोगत मांडत होत्या. यावेळी इतर पालक प्रतिनिधी म्हणून विशाल शेंडे व अफजल शेख हे उपस्थित होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली अनुक्रमे कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.स्वाती पवार, शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार व एमसीएचे विभागप्रमुख प्रा.मनसब शेख यांच्या नेतृत्वाखाली या पालक मेळाव्याचे आयोजन केले होते. कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाची माहिती प्रा. व्ही.डी. जाधव यांनी, सिव्हील इंजिनिअरिंगची सविस्तर माहिती प्रा.अविनाश कोकरे यांनी तर अल्पावधीत जम बसविलेल्या एमसीए या अभ्यासक्रमाची माहिती प्रा. मनसब शेख यांनी दिली. यामध्ये मिळालेली मानांकने, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपलब्ध सोयी सुविधा, ‘कमवा आणि शिका’ योजना, सोलार रुफ टॉप पॉवर प्लांट, प्ले ग्राउंड, जिमखाना, एन.के.एन., अभ्यासक्रमाची व संदर्भ पुस्तके, वसतिगृहातील सुविधा, वाहतुकीसाठी बस, १०२४ एम.बी.पी.एस. क्षमतेची वाय-फाय इंटरनेट सुविधा, फीडबॅक सिस्टम, वार्षिक परीक्षेचा निकाल, प्लेसमेंट मधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची सविस्तर आकडेवारी आदी आवश्यक बाबींची सविस्तर माहिती पालकांना दिली. शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार हे मार्गदर्शन करताना म्हणाले की,‘आपल्या पाल्यामध्ये अनपेक्षित बदल अथवा अभ्यासप्रती टाळाटाळ दिसून आली की पालकांनी त्वरित महाविद्यालयाशी, वर्ग शिक्षकांशी, प्रॉक्टर टीचर यांच्याशी संपर्क साधून पाल्याच्या प्रगती विषयी माहिती घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबद्दल अथवा इतर शैक्षणिक शंका, अडचणी असल्यास त्यांनी त्वरित महाविद्यालयाशी संपर्क साधावा.’ असे आवाहन केले. यावेळी काही पालकांनी उपस्थित केलेल्या सूचनांची नोंद करून घेण्यात आली. काही प्रश्नांचे निराकरण त्वरित करण्यात आले तर काही प्रश्न महाविद्यालय प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवर सोडविले जातील.’ अशी ग्वाही देण्यात आली. अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा.करण पाटील यांनी प्रवेश प्रक्रिया कशी चालते यावर व प्रा. वैष्णवी राजमाने यांनी विद्यार्थ्यांसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाकडून विद्यार्थ्यांची कंपन्यांमध्ये निवड होण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबाबत सांगून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी सादर केली. यावेळी गेट परीक्षेत, महाविद्यालय स्तरीय व विविध उपक्रम राबविल्याबद्दल यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तिन्ही विभागातील विद्यार्थ्यांचे जवळपास ६०० पालक उपस्थित होते. पालक मेळावा यशस्वी करण्यासाठी तिन्ही विभागाचे प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा.प्राजक्ता सातारकर यांनी केले तर कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.स्वाती पवार यांनी उपस्थित पालकांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad