डी.आर.डी.ओ.चे शास्त्रज्ञ डॉ.विजय निंबाळकर यांचे स्वेरीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


डी.आर.डी.ओ.चे शास्त्रज्ञ डॉ.विजय निंबाळकर यांचे स्वेरीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन



पंढरपूर: श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचालित विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी अंबरनाथ येथील नौसेना सामग्री 

अनुसंधान प्रयोगशाळेचे (रक्षा अनुसंधान एवं विकास संघटन) शास्त्रज्ञ डॉ. विजय निंबाळकर, वैज्ञानिक 'डी' यांचे एकदिवसीय मार्गदर्शन सत्र आयोजित केले होते.     

          संपूर्ण जगाला कवेत घेण्याची क्षमता असलेल्या तंत्रशिक्षणातील विविध उपक्रमांतून नव्या दिशांचा शोध घेण्यासाठी स्वेरीचे अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच अग्रेसर असते. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली संशोधन विभागाचे प्रमुख प्रा.अमरजित केणे यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. शास्त्रज्ञ डॉ.विजय निंबाळकर यांनी ‘प्लॅगशिप प्रोडक्ट डेव्हलपमेंट ऑफ डीआरडीओ फॉर डिफेन्स अॅप्लिकेशन’ या विषयावर आणि ‘फ्लॅगशिप प्रोडक्ट्स फॉर नेव्ही अँड मिल्ट्री’ या विषयावर मार्गदर्शन केले. संरक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना असलेल्या नोकरीच्या संधी व त्यासाठी घ्यावी लागणारी कठोर मेहनत या बाबींची देखील डॉ.निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. मार्गदर्शन करताना त्यांनी संरक्षण, संशोधन, आणि विकास संस्थेचे व्हिजन व मिशन याबद्धल माहिती दिली. त्याबरोबरच भारताला समृद्ध करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानांचा उपयोग तसेच या क्षेत्रात होत असणारे अमुलाग्र बदल याबाबत माहिती देऊन गरजेच्या वेळी शस्त्र प्रणाली कशी वापरायची याबद्धल माहिती दिली. सोबत डीआरडीओ च्या जबाबदाऱ्या, संरक्षण क्षेत्रांमधील असलेले अर्जुन ट्रक, मिसाईल्स (अग्नी,आकाश,पृथ्वी आणि ब्रह्मोस) इत्यादीचे गुणधर्म आणि रक्षा विभागासाठी या बाबींचा उपयोग यावर देखील प्रकाश टाकला. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक सिस्टिम (रडार,सोनार) इत्यादींचे गुणधर्म आणि उपयोग सांगितले. समुद्रामधील जहाजे व पाणबुडया साठीचे वेल्डिंग तंत्रज्ञान याबद्दलची ही संपूर्ण माहिती सांगितली. विद्यार्थ्यांकडून भविष्‍यात पाणबुडया आणि जहाजातील विद्यमान बॅटरीजचे चार्जिंग करण्यासाठी सोलर बॅटरी विकसित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. स्वेरीमध्ये असलेल्या स्वयंपूर्ण अशा सोलर पॉवर प्लांट च्या माध्यमातून अभ्यास करून विद्यार्थ्यांनी सोलर बॅटरी निर्मितीचा अभ्यास करण्याबाबत मार्गदर्शन केले. डीआरडीओचे संरक्षण क्षेत्रामध्ये असलेले योगदान, आरोग्य यंत्रणेसाठी स्वदेशी उपकरणांची करून दिलेली उपलब्धता तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना संरक्षण क्षेत्रांमध्ये असलेल्या विविध संधी बाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार डीआरडीओ च्या प्रकल्पावर सुद्धा काम करता येऊ शकते.’ असे प्रतिपादन केले. एरोनॉटिकल सिस्टीम, भारतीय नौसेनेसाठी लागणारी नौसेना एव्हिएशन सिस्टीम आणि मटेरियल्स, मायक्रो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस याबद्दलची उपयुक्त माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. पुढे त्यांनी डी.आर.डी.ओ. चे तंत्रज्ञान,थंड प्रदेशांमध्ये कार्यरत सैनिकांचे अन्नपदार्थ गरम ठेवण्यासाठीची यंत्रसामग्री याबाबत माहिती दिली. डीआरडीओ ची उद्दिष्टे सांगताना म्हणाले की, ‘विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला समृद्ध करणे. गरजेच्या वेळी त्यांचा वापर सुनिश्चित करण्यासाठी शस्त्र प्रणाली विकसित करणे, देशाला उच्च श्रेणीची प्रणाली आणि तांत्रिक उपाय प्रदान करणे, लष्करी जवानांच्या कल्याणासाठी आणि त्यांना सुधारित शस्त्रांसह सशस्त्र करण्यासाठी तांत्रिक उपाय पाहणे, एक उत्तम विकसित पायाभूत सुविधा आणि दर्जेदार मनुष्यबळ स्थापन करणे, एक मजबूत व्यावसायिक समर्थन प्रणाली तयार करणे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संशोधन व तंत्रज्ञान यावर विचारलेल्या प्रश्नांना शास्त्रज्ञ डॉ.निंबाळकर यांनी उत्तरे दिली. सूत्रसंचालन डॉ.यशपाल खेडकर यांनी केले तर विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad