द ग्रीन रँकिंग अवार्डच्या यादीत स्वेरीचा देशात ७२वा क्रमांक
सोलापूर जिल्ह्यातील एकमेव तर महाराष्ट्रातील चार कॉलेजेस पैकी एक
स्वेरीच्या पर्यावरणपूरक कार्याची विशेष दखल
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या शिरपेचात नुकताच आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. ‘सस्टेनेबल इन्स्टीट्युशन्स ऑफ इंडिया’ अंतर्गत ‘दि ग्रीन इस्टीट्युशनल रँकिंग्ज २०२२’ च्या माध्यमातून जाहीर केलेल्या यादीत स्वेरीचा ७२ वा क्रमांक आला असून त्याबाबतचे ‘सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स’ महाविद्यालयास प्राप्त झाले आहे. स्वेरीने सातत्याने पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपण या निसर्गाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या बाबींचा अवलंब केल्यामुळे या यादीत स्वेरीने मानाचे स्थान मिळवले असल्याची माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली.
‘आर वर्ल्ड इस्टीट्युशनल रँकिंग’ तथा सस्टेनेबल एचईआय (उच्च शैक्षणिक संस्था) ही एक संस्था आहे. नैसर्गिक, आर्थिक आणि सामाजिक भांडवलाचा ऱ्हास न करता पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपले कार्य उत्तम पद्धतीने करणाऱ्या संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन या उच्च संस्थेकडून केले जाते. शाश्वत विकासाचे तीन स्तंभ: ‘पर्यावरण (ग्रह), सामाजिक (लोक) आणि आर्थिक (नफा) हे आहेत. भारतीय संस्थांमध्ये शाश्वत विकासाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि अशा संस्थाना पाठिंबा देण्याचे कार्य ‘आर वर्ल्ड इस्टीट्युशनल रँकिंग’ हि संस्था करते. निरोगी वातावरणात जागतिक आणि सर्वांगीण शिक्षण देण्याच्या स्वेरीच्या सततच्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून ‘स्वेरी’ला हा ‘द ग्रीन रँकिंग अवार्ड’ देण्यात आला आहे. संपूर्ण भारतातून गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला देशात ७२वा क्रमांक मिळाला आहे. गेल्या महिन्यामध्ये ‘आर वर्ल्ड द ग्रीन रँकिंग २०२२’ साठी संपूर्ण देशभरातून प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यात स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या नियोजनात्मक मार्गदर्शनाखाली स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरच्या ग्रीन टीमचे मार्गदर्शक डॉ. प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली डॉ. विद्याराणी क्षीरसागर व ग्रीन टीमचे समन्वयक प्रा. कुलदीप पुकाळे यांच्या सहकार्याने सहभाग नोंदविला गेला. या प्रस्तावामध्ये महाविद्यालयात असलेल्या पर्यावरण संतुलनाच्या विविध सोयी सुविधा, महाविद्यालयातील सीवेज ट्रीटमेंट प्लांट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ४०० किलो वॅट वीज निर्मितीची सोलर सिस्टम व स्वच्छतेच्या बाबतीत असणारे व्यवस्थापन या बाबींचा समावेश होता. स्वेरीकडून नेहमीच वृक्ष लागवड व वृक्ष संगोपनाला प्राधान्य दिले जाते. दरवर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित ‘नो प्रायवेट व्हेईकल डे’ साजरा केला जातो त्या माध्यमातून प्रदूषण नियंत्रणास नक्कीच हातभार लागतो. स्वेरी मध्ये कचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक व पर्यावरण पूरक बाबींचा अवलंब केला जातो. या आणि अशा सर्व उपक्रमांचा एकंदरीत परिपाक म्हणजे स्वेरीला मिळालेला हा अवार्ड होय, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. या यशाबद्दल स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले यांच्यासह इतर विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज, स्वेरी अंतर्गत असणाऱ्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी स्वेरीच्या ‘ग्रीन टीम’ चे अभिनंदन केले.