अपघातग्रस्तांना तातडीने मदत करून जीवदान देणाऱ्या तिघांना ‘मृत्युंजय दूत’ पुरस्कार
सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालय, सोलापूर :
अपघातग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवून त्यांचे प्राण वाचविण्यासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनवलीचे पोलीस पाटील तोफिक मनसूब शेख, राजनी गावचे पोलीस पाटील बाबासाहेब कुबेर भाकरे तसेच अनवली ग्रामपंचायतीचे क्लर्क अविनाश दत्तात्रय बारले यांना ‘मृत्युंजय दूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण माननीय अतुल कुलकर्णी साहेब, पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे मॅडम, सोलापूर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दीपक बर्डे साहेब, पंढरपूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. प्रशांत डगळे साहेब, पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. सुरेश चिल्लावर साहेब तसेच वाहतूक शाखेचे सीओ हवालदार संतोष नरळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अपघाताच्या प्रसंगी वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेणे, जखमींना तातडीने मदत उपलब्ध करून देणे आणि त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणे, या सामाजिक व मानवतावादी कार्याची दखल घेत संबंधितांचा सन्मान करण्यात आला.
सदर पुरस्कार वितरण कार्यक्रम पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथील संवाद हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
अपघातग्रस्त व्यक्तीला वेळेवर मिळणारी मदत अनेकदा त्याचे प्राण वाचविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यामुळे नागरिकांनीही अपघाताच्या वेळी मदतीसाठी पुढाकार घ्यावा, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
पुरस्कारप्राप्त तिघांचे सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासन, पोलीस पाटील संघटना तसेच अनवली व राजनी ग्रामस्थांकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

