सरकोलीतील महिलांसाठी मोफत देवदर्शन यात्रा; अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांचे घेतले दर्शन
भगीरथदादा भालके यांच्या मार्गदर्शनाखाली भारत नाना भालके फाउंडेशनचा उपक्रम
सरकोली, प्रतिनिधी : नवरात्रोत्सवानिमित्त मौजे सरकोली, ता. पंढरपूर येथील महिलांसाठी स्वर्गीय लोकनेते आमदार भारत नाना भालके फाउंडेशनच्या वतीने मोफत देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. युवा नेते भगीरथदादा भालके यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाची माहिती फाउंडेशनच्या अध्यक्ष तथा पंढरपूर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉ. प्रणिताताई भगीरथ भालके यांनी दिली.
या यात्रेच्या माध्यमातून महिलांना श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर, अक्कलकोट; श्री तुळजाभवानी माता मंदिर, तुळजापूर; श्री मार्डी येथील देवस्थान तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पंढरपूर या पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत आज महिलांनी अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी महिलांनी भक्तिभावाने दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतला. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेमुळे सरकोलीतील महिलांना धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्याची संधी मिळत असून, परिसरात या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित होत आहे.
महिलांना धार्मिक आणि आध्यात्मिक अनुभव मिळावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम नवरात्रोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात पार पडत आहे.


