सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी,पंढरपूर मध्ये ‘सिंहगड हॅकॅथॉन २०२६’(Sinhgad Hackathon 2K26) उत्साहात संपन्न
कोर्टी, पंढरपूर : सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना, सर्जनशीलतेला आणि नवकल्पनांना चालना देण्याच्या उद्देशाने ‘सिंहगड हॅकॅथॉन २०२६’ (Sinhgad Hackathon 2K26) या तांत्रिक उपक्रमाचे आयोजन दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या हॅकाथॉनमध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही क्षेत्रांवर आधारित विविध तांत्रिक समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी तब्बल ११५ टीम्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
हॅकाथॉनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वास्तविक जीवनातील विविध तांत्रिक समस्या ओळखून त्यावर हार्डवेअर व सॉफ्टवेअरच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण, व्यवहार्य आणि प्रभावी उपाय विकसित करण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांनी आपल्या तांत्रिक ज्ञानाचा, सर्जनशील विचारांचा आणि कल्पकतेचा वापर करून विविध समस्या सोडविण्यासाठी प्रकल्प, प्रोटोटाइप, डिजिटल सोल्यूशन्स आणि तंत्रज्ञानाधारित उपाययोजना सादर केल्या.
हार्डवेअर आधारित प्रकल्पांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, आयओटी(IoT) ऑटोमेशन, एम्बेडेड सिस्टीम्स, सेन्सर-आधारित प्रणाली तसेच स्मार्ट उपकरणांच्या निर्मितीवर भर देण्यात आला. तर सॉफ्टवेअर आधारित प्रकल्पांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा अनालिटिक्स, वेब व मोबाईल ॲप्लिकेशन्स, ऑटोमेशन, क्लाउड तंत्रज्ञान आणि समस्या-निराकरणासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म यांसारख्या विविध तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे आणि उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता समस्या निराकरणाची क्षमता, सर्जनशील विचार, टीमवर्क, नेतृत्वगुण आणि अद्ययावत तांत्रिक कौशल्ये विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. हॅकाथॉनसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समस्या समजून घेऊन हार्डवेअर व सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रभावी उपाय विकसित करण्याचा अनुभव मिळतो, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विनायक जगताप यांनी केले. त्यांच्या प्रभावी सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.
यावेळी महाविद्यालयातील विविध विभागांचे विभागप्रमुख कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाचे डॉ. सुभाष पिंगळे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभागाचे डॉ. नामदेव सावंत, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे डॉ. श्याम कुलकर्णी, सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे डॉ. यशवंत पवार, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाचे डॉ. अल्ताफ मुलाणी तसेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचे डॉ. शिवशंकर कोंडरू यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
विभागप्रमुख व शिक्षकांनी सहभागी विद्यार्थ्यांना प्रकल्प विकास, तांत्रिक अंमलबजावणी, समस्या निराकरण आणि सादरीकरणाबाबत मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. ११५ टीम्सच्या सहभागामुळे हॅकाथॉनला मोठा प्रतिसाद मिळाला असून विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक ज्ञानासोबतच सर्जनशीलता, नेतृत्वगुण, संघभावना, नवोपक्रमशीलता आणि समस्या निराकरणाची कौशल्ये विकसित होण्यास मदत झाली.
‘सिंहगड हॅकॅथॉन २०२६'(Sinhgad Hackathon 2K26) हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना व्यासपीठ देणारा, हार्डवेअर व सॉफ्टवेअर क्षेत्रातील कौशल्यांना चालना देणारा आणि त्यांच्या तांत्रिक क्षमतांना योग्य दिशा देणारा ठरला. विद्यार्थ्यांमध्ये या उपक्रमाबद्दल मोठा उत्साह दिसून आला.

