*सिंहगडमध्ये ‘करिअर रेडिनेस’ कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेला बळकटी*
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सिंहगडमध्ये ‘करिअर रेडिनेस’ या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सुमारे १०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
प्रसिद्ध व्यावसायिक प्रशिक्षक श्री. किरण पाटमसे यांनी विद्यार्थ्यांना तीन दिवस कृतीआधारित प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणामध्ये सॉफ्ट स्किल्स, इंग्रजी संभाषण कौशल्य, आत्मविश्वास वाढविणे, प्रभावी संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, टीमवर्क तसेच व्यावसायिक वर्तन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर विविध उपक्रमांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.
अभियांत्रिकी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संवादकौशल्य, आत्मविश्वास, नेतृत्वगुण, समस्या सोडविण्याची क्षमता आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित होणे ही आजच्या स्पर्धात्मक रोजगार बाजारपेठेची गरज आहे. अशा प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना केवळ मुलाखतीसाठी नव्हे, तर उद्योगक्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाजासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास मोठी मदत होते. विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
ट्रेनिंग प्लेसमेंट सेलच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबतच उद्योगाच्या अपेक्षांनुसार आवश्यक असलेली सॉफ्ट स्किल्स व व्यावसायिक कौशल्ये मिळावीत, यासाठी विविध कौशल्यविकास उपक्रम राबविले जात आहेत. ‘इंडस्ट्री रेडी इंजिनियर्स’ घडविण्याच्या संस्थेच्या प्रयत्नांचा हा कार्यक्रम एक महत्त्वपूर्ण भाग असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आणि प्रशिक्षणातील उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, संवादकौशल्य व करिअरविषयक तयारीवर सकारात्मक परिणाम झाला.
या उपक्रमासाठी संस्थेचे व्यवस्थापन, प्राचार्य डॉ. कैलास करांडे,यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. शाम कुलकर्णी तसेच प्रशिक्षण व प्लेसमेंट सेल विभाग प्रमुख डॉ समीर कटेकर यांनी विशेष पुढाकार घेतला.

