स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीला ‘बेस्ट कॉलेज अवार्ड’
पुण्यातील ‘फार्मोत्सव २०२६’ या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात केला गौरव
पंढरपूर–पुण्यातील नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन, इंडिया यांच्या वतीने आयोजिलेल्या ‘फार्मोत्सव २०२६’ या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीला ‘आदर्श फार्मसी शिक्षण पदवी संस्था’ म्हणून गौरविण्यात आले, त्याबद्दल स्वेरीच्या फार्मसी महाविद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राष्ट्रीय फार्मसी वेल्फेअर असोसिएशन ही महाराष्ट्रातील फार्मासिस्ट, प्राध्यापक, विद्यार्थी आणि फार्मसी महाविद्यालयांना एकत्र आणणारी अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून करिअर मार्गदर्शन, जॉब फेअर, संशोधन उपक्रम, वर्ल्ड फार्मासिस्ट डे आणि राज्यस्तरीय शैक्षणिक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते. संपूर्ण महाराष्ट्रातील विविध फार्मसी महाविद्यालये एनपीडब्ल्यूएच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी आहेत. ‘फार्मोत्सव २०२६’ हा एनपीडब्ल्यूएच्या सहकार्याने राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला राज्यस्तरीय उपक्रम होता. दि.१२ सप्टेंबर २०२६ रोजी पुणे येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात अकॅडेमिया, फार्मा उद्योग आणि नियामक क्षेत्रातील तज्ज्ञांनी संशोधन, नवोपक्रम आणि रोजगाराच्या संधींवर मार्गदर्शन केले. एनपीडब्ल्यूएच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष डॉ. सचिन कोतवाल, उपाध्यक्ष डॉ. अमोल शाह, सचिव डॉ. संपत नवले, संयुक्त सचिव प्रा. प्रविण जावळे आणि कोषाध्यक्ष डॉ. नरहरी पाटील यांचा समावेश आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली एनपीडब्ल्यूए ही संस्था महाराष्ट्रातील फार्मसी शिक्षण आणि फार्मासिस्ट कल्याणासाठी सातत्याने कार्यरत आहे. या राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान समारंभामध्ये नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशनच्या वतीने ‘फार्मोत्सव २०२६’ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष प्रविण जावळे यांनी केले. अध्यक्ष डॉ.सचिन कोतवाल यांनी असोसिएशनच्या वतीने सर्व उपस्थितांचे स्वागत केले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी भारती विद्यापीठाच्या प्रांगणात होणाऱ्या या समारंभ प्रसंगी भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या बरोबरीने मिळालेल्या अनेक वर्ष सहवासाची अनुभूती सांगितली तसेच फार्मसी क्षेत्रातील अनेक प्रश्नांवर एकत्र येण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशनच्या तज्ञ समिती सदस्यासोबत लवकरच बैठक आयोजित करून सर्व गोष्टींचा आढावा घेऊन सदर बाब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडण्याची भूमिका विशद केली. आरोग्य क्षेत्रामध्ये फार्मासिस्ट हा केवळ मेडिकल दुकानापुरता मर्यादित नसून तो औषध निर्मात्यापासून संशोधक ते उद्योजक या व्यापक स्वरूपात महत्वपूर्ण कार्य करतो. भारतीय शिक्षण व्यवस्था आणि त्यामधील कांही महत्त्वपूर्ण बदल याविषयी देखील त्यांनी आपले विचार मांडले. गुणवंत विद्यार्थी व फार्मसी क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या पुरस्कार प्राप्त अनेक मान्यवरांचे देखील त्यांनी यावेळी अभिनंदन केले. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य मा.विजय पाटील यांनी देखील गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी तंत्रशिक्षण संचालनालय पुणे विभाग सहसंचालक डॉ. सुरेश पाटील यांनी देखील फार्मसीमध्ये हा उपक्रम निश्चितच नाविन्यपूर्ण आहे व नवीन मुलांना नवीन नेतृत्व घडवण्याची प्रेरणा देणारा आहे असे सांगितले. स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी यावेळी फार्मसी शिक्षण व्यवस्थेमध्ये होऊ घातलेले नाविन्यपूर्ण बदल याविषयी भाष्य केले. याप्रसंगी असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. अमोल शहा, सचिव डॉ. संपत नवले, सहसचिव व मुख्य समन्वयक डॉ. प्रफुल्ल आडकर पाटील, खजिनदार डॉ. नरहरी पाटील, सदस्य डॉ. स्वामी जी. एम.,कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ. निर्मल कासेकर, मुख्य सल्लागार डॉ. व्ही.एन.जगताप व प्रा. पोपट जाधव इ. मान्यवर उपस्थित होते. स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीला ‘बेस्ट कॉलेज अवार्ड’ मिळाल्यामुळे संस्थेचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे, अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस.व्ही.मांडवे, स्वेरी लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ.बनकर, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पदवीच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, इतर अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीच्या संपूर्ण स्टाफचे अभिनंदन केले आहे. या 'फार्मोंत्सव २०२६' मध्ये श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॉलेज ऑफ फार्मसी, पंढरपूरला 'बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड २०२६' घोषित करण्यात आला. सन २००६ मध्ये स्थापन झालेल्या स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी, पंढरपूरने फार्मसी शिक्षणासोबतच संशोधन आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोलापूर विद्यापीठ (आताचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ) मान्यताप्राप्त असलेल्या या महाविद्यालयाने स्थापनेपासून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा जपली आहे. महाविद्यालयात २००६ मध्ये बी. फार्मसी हा अभ्यासक्रम सुरू झाला त्यानंतर २०१० मध्ये एम. फार्मसी या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि २०१६ मध्ये पीएच.डी. संशोधन केंद्राला मान्यता मिळाल्याने संशोधनाला नवे बळ प्राप्त झाले. आज हे महाविद्यालय पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट स्तरावरील शिक्षण व संशोधनासाठी एक सक्षम केंद्र म्हणून विकसित झाले आहे. संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत महाविद्यालयाच्या प्राध्यापक व संशोधकांनी २४ पेटंट प्रकाशित केली असून १०० हून अधिक संशोधन निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित केले आहेत. याशिवाय संशोधन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेत विविध शासकीय संस्थांकडून संशोधन प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी सुमारे ४५ लाख रुपयांचा संशोधन निधी उपलब्ध झाला आहे.
चौकट- या भरगच्च महोत्सवात फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे विजय पाटील म्हणाले की, ‘पुढील ‘फार्मोत्सव २०२७’ ला आपण पंढरपूर मधील स्वेरीच्या डॉ. बी.पी. रोंगे सरांना आमदार म्हणून बोलवायचे आहे, त्यासाठी पाठिंबा देत आहे. यावर उपस्थितांनी टाळ्यांनी प्रतिसाद देत डॉ. बी.पी. रोंगे सरांना यंदाच्या निवडणुकीत सहकार्य करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला.

