*विद्युत अभियांत्रिकी विभाग, एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी-पंढरपूर यांनी आय. ई. ई. ई. स्टुडंट ब्रँचच्या सहकार्याने “इंडस्ट्रियल ऑटोमेशन युजिंग ऑर्डिनो, आयओटी आणि इएसपी३२” या विषयावरील एक आठवड्याच्या मूल्यवर्धित प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन*
पंढरपूर - प्रतिनिधी
विद्युत अभियांत्रिकी विभाग, एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी-पंढरपूर यांनी आय. ई. ई. ई. स्टुडंट ब्रँचच्या सहकार्याने तृतीय वर्ष विद्युत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी “इंडस्ट्रियल ऑटोमेशन युजिंग ऑर्डिनो, आयओटी आणि इएसपी३२” या विषयावरील एक आठवड्याचा मूल्यवर्धित प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक २७ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विद्युत अभियांत्रिकी विभागामध्ये यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. के. जे. करांडे आणि उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सदर प्रशिक्षण इन्फो ऑटोटेक इंडिया, बारामती येथील तज्ज्ञ प्रशिक्षकांनी दिले. त्यांनी ऑर्डिनो, प्रोग्रामिंग, इएसपी३२ आधारित आयओटी अनुप्रयोग, औद्योगिक ऑटोमेशन, सेन्सर इंटरफेसिंग, औद्योगिक कम्युनिकेशन प्रोटोकॉल, क्लाउड कनेक्टिव्हिटी तसेच रिअल-टाइम ऑटोमेशन प्रणाली यांविषयी सखोल मार्गदर्शन केले.
या मूल्यवर्धित कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना आधुनिक ऑटोमेशन तंत्रज्ञानाचे व्यावहारिक ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव देऊन शैक्षणिक अभ्यासक्रम आणि औद्योगिक गरजा यांतील दरी कमी करणे हा होता. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी ऑर्डिनो, व इएसपी३२ च्या साहाय्याने आयओटी आधारित प्रकल्प विकसित केले तसेच उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या आधुनिक ऑटोमेशन तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती घेतली. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांमध्ये, नावीन्यपूर्ण विचारसरणीत आणि समस्या सोडविण्याच्या क्षमतेत लक्षणीय वाढ झाली.
कार्यक्रमास विद्युत अभियांत्रिकी विभाग प्रमुख, आय. ई. ई. ई. वरिष्ठ सदस्य व आय. ई. ई. ई. स्टुडंट ब्रँच समुपदेशक डॉ. के. शिवशंकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले.
या मूल्यवर्धित प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक श्री. डी. एम. कोरके, सौ. एस. डी. घोडके, श्री. ए. एन. गोडसे आणि श्री. एम. आर. खडतरे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करून यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित केली.

