*एनसीईआरटी विरोधात वंशजांची मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल ;* *मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी महाराष्ट्रात रोष ;*


*एनसीईआरटी विरोधात वंशजांची मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल ;*


*मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी महाराष्ट्रात रोष ;*



पुणे (प्रतिनिधी) : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने आठवीच्या इतिहास विषयातील पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा गौरवशाली विस्तारक्षेत्र दर्शवणारा नकाशा हटविल्याच्या चुकीच्या व अन्यायकारक निर्णयाविरोधात आता महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसं जातीभेद, धर्मभेद राजकीय मतभेद , गटतट विसरून मराठी बाण्यासाठी एकवटले असून शिवछत्रपतींच्या स्वराज्यातील श्रीमंत भोसले घराणे, श्रीमंत राजे शिर्के घराणे, सुभेदार मालुसरे घराणे आदी राजघराणे व सरदार वंशज घराण्यांसह अन्य मराठे शूरवीर सरदार घराणे, वीर मावळ्यांच्या घराण्याचे प्रमुख वंशज प्रतिनिधी, गडदुर्ग संवर्धक, इतिहास प्रेमी व शिव- शंभुभक्तांनी नुकतीच पुणे येथील पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे प्रमुख वंशज मान्यवरांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीईआरटीने तात्काळ चुक दुरुस्त करावी अन्यथा मराठे मुंबई, दिल्ली पर्यंत आंदोलना माध्यमातून धडकतील असा कडक इशारा राज्य व केंद्र सरकारला दिला आहे. 


नागपूरचे राजे रघुजीराजे भोसले यांचे वंशज श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली एनसीईआरटी (NCERT) ने पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटविल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात कायदेशीर आव्हान देण्यात आले असून, सदर जनहित याचिका (PIL) इतिहासप्रेमी व वंशजांनी दाखल केली आहे. पत्रकार परिषदेत शंभुपत्नी महाराणी येसुबाईंचे वडील स्वराज्य निष्ठावंत श्रीमंत पिलाजीराव राजे शिर्के यांचे वंशज शंभुसेना प्रमुख श्रीमंत दिपकराजे शिर्के, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरेंचे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे आदींसह अन्य वंशज घराणी, गडदुर्ग संवर्धक , इतिहासप्रेमी, शिव-शंभुसैनिक व शिव- शंभुभक्त उपस्थित होते. यावेळी बोलताना वंशजांनी आक्रमक पवित्रा घेत केलेल्या चुकीबद्दल रोष व्यक्त केला. 


याचिकाकर्ते राजे मुधोजी महाराज भोसले ( नागपूर ) , शंभुसेना प्रमुख दिपकराजे शिर्के ( पुणे ), शिवाजीराजे जाधव ( सिंदखेडराजा ) , ऋषिकेश निकम पाटील

(छत्रपती संभाजीनगर) , रघुजीराजे आंग्रे (अलीबाग ) , रविंद्र पडवळ ( पुणे ) , कुणाल मालुसरे ( पुणे ) , राम नारायण मराठा पानीपत ( हरीयाणा ) , शरद मोडे ( बीड ) , अर्थव मारणे ( पुणे ) आदी असून याचिकेत मुख्य मुद्दे मांडत इतिहास विद्रुपीकरण कसे केले, याचिकेत सविस्तर नमूद करण्यात आले आहे की, मराठा साम्राज्याने अठराव्या शतकात भारताच्या मोठ्या भूभागावर अधिपत्य गाजवले होते. मात्र, एनसीईआरटीने ( NCERT ) नवीन बदलांमध्ये हा ऐतिहासिक नकाशा वगळून नवीन पिढीला खऱ्या इतिहासापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.


एनसीईआरटीने थेट मराठा अस्मितेवरच घाला घातल्याने, मराठा साम्राज्य हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून ते अटकेपार पसरलेले राष्ट्रव्यापी मराठा साम्राज्य होते. असा नकाशा हटवणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शौर्य परंपरेचा , कार्य कर्तृत्वाचा, पराक्रमी वारशाचा , महाराष्ट्रातील व भारतातील आठरापगड जातीचा अपमान असल्याची भावना याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करून NCERT ला सुधारित पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा समाविष्ट करण्याचे आदेश द्यावेत, अशी मुख्य मागणी करण्यात आली आहे.


आपल्या पूर्वजांनी रक्ताचे पाणी करून हे रयतेचे स्वराज्य आणि मराठा साम्राज्य उभे केले. जगाला हेवा वाटेल असा आपला इतिहास आहे. पुस्तक, ग्रंथ, चित्रपट, सिरियल, मालिका, महानाट्य, नाटकाच्या माध्यमातून जर कोण इतिहास पुसण्याचा, चुकीचा दाखविण्याचा , तो कमी लेखण्याचा प्रयत्न करत असेल, तर महाराष्ट्रासह भारत देशातील, जगातील मराठा समाज व आम्ही वंशज मावळे गप्प बसणार नाही. भावी पिढीला शुद्ध आणि सत्य इतिहास मिळावा, यासाठीच आम्ही हा न्यायालयीन लढा पुकारला असल्याचे मत पत्रकार परिषदे दरम्यान श्रीमंत राजे मुधोजी भोसले, श्रीमंत दिपकराजे शिर्के, कुणाल मालुसरे व अन्य वंशजांनी व इतिहास प्रेमींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 


सदर याचिकेवर लवकरच मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. या लढ्याला शिव-शंभू प्रेमी आणि इतिहासकारांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. अनेक विविध मुद्याच्या आधारवर २६६ पानांची जनहित याचिका (PIL) मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पुणे येथील पत्रकार भवनात पत्रकार परिषदे प्रसंगी नागपूरचे महाराज राजे मुधोजी महाराज भोंसले, माजी सैनिक अधिकारी दिपकराजे शिर्के साहेब, सुभेदार कुणाल मालुसरे, रविंद्र पडवळ , ऋषिकेश निकम पाटील, चंद्रकांत ढेंबरे व इतर शिवप्रेमी, इतिहास प्रेमी संघटना, समर्थक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad