स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांची उजनी धरणाला शैक्षणिक भेट
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील द्वितीय व अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक 17 जुलै 2026 रोजी उजनी धरणाची शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सदर भेटीमध्ये विद्यार्थ्यांनी धरणाची उंची, पाणी साठवण क्षमता, धरणाची रचना तसेच विविध तांत्रिक बाबींची प्रत्यक्ष पाहणी केली. उजनी धरणातील संबंधित अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना धरणाच्या कार्यपद्धती, देखभाल, जलव्यवस्थापन आणि अभियांत्रिकीतील विविध पैलूंविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील अभ्यासक्रमात फ्लुड मेकॅनिक्स तसेच हायड्रोलिक स्ट्रक्चर अँड वॉटर पावर इंजिनिअरिंग हे विषय समाविष्ट असल्याने या शैक्षणिक भेटीचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान मिळविण्यासाठी मोठा फायदा झाला. या भेटीचा उपयोग विद्यार्थ्यांना प्रकल्प तयार करणे, तांत्रिक अभ्यास आणि भविष्यातील व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यासाठी होणार आहे.
या शैक्षणिक भेटीत स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील ११० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ही औद्योगिक भेट यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे , उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभाग प्रमुख डॉ. यशवंत पवार, प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. गणेश लकडे, प्रा. अमोल कांबळे, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. सिद्धेश पवार, प्रा. निखत खान यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

