सकारात्मक विचार केल्याने भविष्यात फायदा -सचिव डॉ. सुरज रोंगे स्वेरीमध्ये ३५३ वा 'शिवराज्याभिषेक दिन' उत्साहात साजरा



सकारात्मक विचार केल्याने भविष्यात फायदा -सचिव डॉ. सुरज रोंगे


स्वेरीमध्ये ३५३ वा 'शिवराज्याभिषेक दिन' उत्साहात साजरा



पंढरपूर- 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमुळे, शौर्यामुळे, परीश्रमांमुळे आणि योगदानामुळे आज आपण चांगले आयुष्य जगत आहोत. महाराजांचे राष्ट्रनिर्माणातील योगदान, स्वराज्याची संकल्पना विचारात घेऊन युवकांनी समाजहितासाठी कार्य करण्याची आवश्यकता आहे. छत्रपती शिवरायांचे विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजसेवा, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकी जपण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कष्ट, गुणग्राहकता, न्याय-निवाडा, नेतृत्व, परिश्रम, वैज्ञानिक दृष्टिकोन, लोकाभिमुख प्रशासन अशा विविध गुणांचे परीक्षण करता विश्वात त्यांचा आदर्श घेतला जातो. एकूणच सकारात्मक विचार केल्याने सर्वांची प्रगती होत असते.' असे प्रतिपादन स्वेरीचे सचिव डॉ. सुरज रोंगे यांनी केले.

      स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली, गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पदवी व पदविका) व कॉलेज ऑफ फार्मसी (पदवी व पदविका) मधील राष्ट्रीय सेवा योजना व क्रिडा विभागाच्या वतीने स्वेरीमध्ये ३५३ वा 'शिवराज्याभिषेक दिन' तथा 'शिवस्वराज्य दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी भव्य शिवमुर्तीचा दुग्ध अभिषेक व पूजन संस्थेचे सचिव डॉ. सुरज रोंगे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर उपस्थितांनी ‘शिवप्रतिज्ञे’चे सामूहिक वाचन करून शिवरायांच्या आदर्शांचे पालन करण्याचा संकल्प केला. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. नीता तळवलकर यांनी 'शिवराज्याभिषेक दिना'चे महत्व सांगून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला. पुढे स्वेरीचे सचिव डॉ. सुरज रोंगे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकून त्यावेळची स्थिती व आजची परिस्थिती याबाबत विश्लेषण केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, अधिष्ठाता, विभागप्रमुख, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे यांच्यासह प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad