स्वेरीच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागाचा पालक मेळावा संपन्न


स्वेरीच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागाचा पालक मेळावा संपन्न




पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सिव्हील इंजिनिअरिंग या विभागातर्फे ‘पालक मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याच्या निमित्ताने पालक आणि शिक्षक यांच्यात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने झालेल्या संवादाचा फायदा विद्यार्थ्यांना होणार हे मात्र निश्चित!

      याप्रसंगी व्यासपीठावर पालक प्रतिनिधी म्हणून दौंडचे महादेव दमगुडे तर महिला पालक प्रतिनिधी म्हणून दुर्गा अमर आवताडे ह्या उपस्थित होत्या. दीपप्रज्वलनानंतर सिव्हील इंजिनिअरिंग विभागातर्फे डॉ. माणिक देशमुख यांनी आपल्या विभागातील विशेष बाबी सादर केल्या. यामध्ये त्यांनी प्रयोगशाळेत उपलब्ध असणारी यंत्रसामुग्री, मशीन्स यापासून ते इंडस्ट्रीयल व्हिजीटच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी कसे कामकाज चालते याचे प्रात्यक्षिक, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी आदी बाबींवर प्रकाश टाकला. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण आणि उच्च करिअरची दारे खुली होत असल्याचे सांगण्यात आले. स्वेरीचे संस्थापक व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांसंदर्भात अवलंबिले जाणारे विकासात्मक धोरण, नियोजनात्मक मार्गदर्शन आणि उच्चशिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने स्वेरीत 'गेट' परीक्षेची करून घेतली जाणारी तयारी याबाबत सांगितले. प्रत्येक वर्षी विविध विषयांचे मार्गदर्शन वर्ग आयोजित करून तसेच ‘ॲडव्हान्सड टेक्निकल ट्रेनिंग’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अशा परीक्षांसाठी आवश्यक संपूर्ण तयारी करून घेतली जाते. वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या टेस्ट आणि त्यांचे विश्लेषण यामधून विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणातील अद्ययावत माहिती दिली जाते. त्यामुळे स्वेरीतील विद्यार्थ्यांना अशा परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच या परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारे सर्व स्टडी मटेरियल हे स्वेरीच्या नूतन इमारतीत असलेल्या मुख्य लायब्ररीमधून उपलब्ध करून दिले जाते, असेही सांगितले. यावेळी सिव्हील इंजिनिअरिंग विभागांतील प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. प्लेसमेंट विभागाचे प्रा. अविनाश मोटे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या ‘गेट परीक्षा, स्वेरीमध्ये येणाऱ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्या, प्लेसमेंट विभागामार्फत चालणारे कार्य, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढीसाठी व करिअर करण्यासाठी आवश्यक बाबी, इंग्रजी भाषा कौशल्ये, संभाषण कौशल्य, सादरीकरण, प्रकल्प, तांत्रिक प्रशिक्षण इंटर्नशीप, स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी? हे करताना पालकांनी नेमकी कोणती भूमिका घ्यावी ? आदी करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या बाबींची पालकांना माहिती दिली. पालक प्रतिनिधी महादेव दमगुडे म्हणाले की, स्वेरीत केवळ पुस्तकी शिक्षणच दिले जाते असे नव्हे तर शिक्षणाबरोबरच चांगले संस्कारही दिले जातात त्यामुळे येथे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल आहे. म्हणून आमच्यासारखे अनेक पालक स्वेरीच्या नियमांमुळे प्रचंड समाधानी आहेत. स्वेरीत अभ्यासासाठी सातत्याने पाठपुरावा केला जातो. विद्यार्थ्यांसाठी जादा तास घेतले जावेत तसेच नाईट स्टडी कंपल्सरी असावी. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासाकडे वळतात व त्यांचे भविष्य उज्ज्वल होते ही बाब खरोखर स्वागतार्ह आहे.’ यावेळी अशोक द्यावनपल्ली, काकडे, ठोंबरे, चव्हाण, बागल, मोरे, यांच्यासह इतर पालकांनी काही सूचना केल्या असता सहा. विभागप्रमुख डॉ. माणिक देशमुख यांनी काही सूचनांचे निरसन जागीच केले तर काही सूचना महाविद्यालय प्रशासनाबरोबर चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले. स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजिलेल्या या पालक मेळाव्यात जवळपास २०० पालक, तसेच सिव्हील विभागातील प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा.पी. बी. भागानगरे यांनी पालक मेळाव्याचे सूत्रसंचालन करून आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad