सिंहगड कॉलेज, पंढरपूरला ‘पीसीईआरएफ’ चे उपकेंद्र : विद्यार्थ्यांना संशोधन व उद्योग अनुभवाच्या नव्या संधी*

 *सिंहगड कॉलेज, पंढरपूरला ‘पीसीईआरएफ’ चे उपकेंद्र : विद्यार्थ्यांना संशो


धन व उद्योग अनुभवाच्या नव्या संधी*


पंढरपूर : पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाउंडेशन (पीसीईआरएफ) यांच्या वतीने पुणे येथे आयोजित उपकेंद्र कॉन्क्लेव्हमध्ये एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाला ‘पीसीईआरएफ’ चे उपकेंद्र म्हणून मान्यता प्रदान करण्यात आली. या मान्यतेमुळे परिसरातील तांत्रिक शिक्षणाला उद्योगाभिमुख दिशा मिळणार असून विद्यार्थी, प्राध्यापक आणि बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्यातील सहकार्य अधिक बळकट होणार आहे.

या उपकेंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञानापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, संशोधनाची दिशा आणि उद्योगातील कार्यपद्धती यांचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच फिल्ड ट्रेनिंग, इंटर्नशिप, तज्ज्ञांची व्याख्याने, तांत्रिक कार्यशाळा आणि विविध उद्योग-अकादमिक उपक्रमांचे नियमित आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला चालना मिळून उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील दुवा अधिक मजबूत होणार आहे.

पुणे येथे आयोजित या कॉन्क्लेव्हसाठी एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरचे प्रतिनिधित्व सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील प्रा. गणेश लकडे व प्रा. अमोल कांबळे यांनी केले. तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून प्रणव वनवे व ओम जाधव उपस्थित होते.

या मान्यतेमुळे सिव्हिल इंजिनिअरिंग व आर्किटेक्चर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना संशोधन, नवकल्पना आणि उद्योग-अनुभवाच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असे मत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी व्यक्त केले. तांत्रिक शिक्षण अधिक दर्जेदार व उद्योगाभिमुख करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

या उपकेंद्राचे कार्यक्षेत्र सोलापूर जिल्हा व परिसर असेल. त्यामुळे या भागातील सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक तसेच बांधकाम उद्योग क्षेत्राला विविध शैक्षणिक व तांत्रिक उपक्रमांचा लाभ मिळणार आहे. या मान्यतेमुळे विभागाला उद्योग क्षेत्राशी अधिक जवळून काम करण्याची संधी मिळणार असून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रकल्प, इंटर्नशिप आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. यशवंत पवार यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad