देशभरातील ५०० विद्यार्थ्यांचा सहभाग : पंढरपूरच्या सिंहगड महाविद्यालयात ‘सिंहगड हॅकाथॉन २०२६’ उत्साहात संपन्न

 *देशभरातील ५०० विद्यार्थ्यांचा सहभाग : पंढरपूरच्या सिंहगड महाविद्यालयात ‘सिंहगड हॅकाथॉन २०२६’ उत्साहात संपन्न*



पंढरपूर : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभाग व एसीएसईएस यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ व १४ मार्च २०२६ रोजी “सिंहगड हॅकाथॉन २०२६” या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा उत्साहात पार पडली.

या स्पर्धेत देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील सुमारे १०० संघांतील जवळपास ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे, ब्राझील येथील एका आंतरराष्ट्रीय संघानेही सहभाग घेत स्पर्धेचे वैशिष्ट्य वाढविले.

स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी ब्लॉकचेन तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, संगणकीय बुद्धिमत्ता, स्मार्ट शिक्षण, शेती तंत्रज्ञान आणि आरोग्य तंत्रज्ञान यांसारख्या विविध विषयांवर आधारित नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले.

२४ तास अखंड चाललेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी तांत्रिक समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय सुचवित उत्कृष्ट संघभावना आणि समस्या सोडविण्याची क्षमता दाखवून दिली.

स्पर्धेचे परीक्षण सुहास भोसले, रुपेश खिल्लारे, मुकुंद गाडवे आणि विनायक जगताप या तज्ज्ञ परीक्षकांनी केले. उद्घाटन समारंभासाठी श्री. नितीन कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

स्पर्धेत एमआयटी आळंदी येथील ‘टीम कन्सेन्सस लॅब’ आणि केबीपी, सातारा येथील ‘टीम न्यूरोवॉक्स’ यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर व्हीआयटी, पुणे येथील ‘टीम स्टॅक ओव्हरफ्लो’ या संघाने उपविजेतेपद मिळविले.

या कार्यक्रमासाठी डीडी इन्फ्रा पंढरपूर, अवधूत ज्वेलर्स, न्यूजन सॉफ्टटेक आणि प्रोअॅझर या संस्थांचे प्रायोजक म्हणून सहकार्य लाभले.

ही स्पर्धा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद गजानन कुलकर्णी आणि संगणक विभागप्रमुख डॉ. सुभाष व्ही. पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. कार्यक्रमाचे संयोजक डॉ. नामदेव एम. सावंत, सहसंयोजक प्रा. सुमीत एस. इंगोले व प्रा. बी. बी. जगदाळे होते. विभागातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

विद्यार्थी समन्वयक म्हणून कु. कुलदीप गोडसे आणि कु. पृथ्वीराज गायकवाड यांनी विशेष योगदान दिले.

विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि उत्कृष्ट तांत्रिक कौशल्यामुळे हा हॅकाथॉन अत्यंत यशस्वी ठरला असून सर्व स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad