“नवकल्पनांना प्रोत्साहन : सिंहगड महाविद्यालयात स्टार्टअप रेडीनेस बूट कॅम्प उत्साहात संपन्न”
पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे “स्टार्टअप रेडीनेस बूट कॅम्प : आयडिया जनरेशन टू मार्केट लॉन्च” या दोन दिवसीय शिबिराचे आयोजन १३ व १४ मार्च रोजी करण्यात आले. हे शिबिर महाविद्यालय व पी. एम. उषा - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमात विविध महाविद्यालयांतील सुमारे २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, वरिष्ठ सल्लागार श्री. सतीश रानडे, वालचंद कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्स, सोलापूर येथील प्राध्यापिका व वाधवानी फाउंडेशन सर्टिफाइड इंटरप्रेनर ट्रेनर डॉ. अर्चना इंजल तसेच महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कुमारी ऋतुजा गायकवाड उपस्थित होते.
या वेळी श्री. सतीश रानडे यांनी “प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन अँड आयडिया जनरेशन” या विषयावर मार्गदर्शन केले. यशस्वी स्टार्टअप उभारण्यासाठी योग्य समस्या ओळखणे व त्यावर आधारित नाविन्यपूर्ण कल्पना विकसित करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वास्तव समस्यांशी निगडित कल्पनांवर पेटंट दाखल करण्याचे महत्त्व अधोरेखित करत 3x5 आणि 5x10 इन्व्हेस्टमेंट मॉडेलिंगची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
डॉ. अर्चना इंजल यांनी व्यवसाय उभारणीसाठी कल्पनांवर काम करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. आर्थिक अडचणींवर उपाय शोधणे, भाषेचा अडथळा न मानता व्यवसाय संकल्पना विकसित करणे तसेच आय.पी.आर. व कॉपीराइटसारख्या विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले.
उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी शिबिराचे उद्दिष्ट स्पष्ट करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची भावना विकसित होते, असे सांगितले. तसेच महाविद्यालयात सुरू असलेल्या ए. आय. सी. टी. ई. आयडिया लॅब विषयी माहिती दिली.
प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी महाविद्यालयातील यशस्वी स्टार्टअपची उदाहरणे देत विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण कल्पनांवर काम करण्यासाठी प्रेरित केले. माजी विद्यार्थिनी कुमारी ऋतुजा गायकवाड यांनी महाविद्यालयातील इन्क्युबेशन सेंटर व त्यातून मिळणाऱ्या संधी याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन डॉ. अतुल आराध्ये यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

