*सिंहगड महाविद्यालय, पंढरपूर येथे ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ उत्साहात साजरा*
एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथे भारताचे थोर वैज्ञानिक भारतरत्न डॉ. सी. व्ही. रमण यांच्या ‘रमण प्रभाव’ या ऐतिहासिक शोधाच्या स्मरणार्थ ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची आवड, जिज्ञासा आणि संशोधनाची वृत्ती विकसित करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन अद्विक क्लब व इन्स्टिटयूट इनोव्हेशन कौन्सिल अंतर्गत करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी महान वैज्ञानिकांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना इन्स्टिटयूट इनोव्हेशन कौन्सिलचे समन्वयक डॉ.संपत देशमुख यांनी केली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सेंटर फॉर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (C-MET) पुणे येथील डॉ. शशिकांत शिवाजी व्हटकर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्याची ओळख इन्स्टिटयूट इनोव्हेशन कौन्सिलचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी करुन दिली. डॉ. शशीकांत व्हटकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ‘रमण प्रभाव’ या शोधासंबंधी रोचक माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच विज्ञान क्षेत्रातील विविध संधी, संशोधनाचे महत्त्व आणि नवकल्पनांची गरज यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांनी भूषविले, तर उपप्राचार्य मा. डॉ. स्वानंद जी. कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. एस. एस. घोंगडे आणि प्रा.एस. डी. घोडके यांनी समन्वयक म्हणून उत्कृष्ट नियोजन केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रकल्प, मॉडेल्स आणि सादरीकरणांद्वारे आपली सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्ये प्रभावीपणे सादर केली.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला असून विज्ञान क्षेत्रात नव्या संधी व दिशांचा परिचय करून देणारा ठरला. “विज्ञान हेच भविष्य आहे” या प्रेरणादायी संदेशाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु.आनम बेद्रेकर व साक्षी माळी यांनी केले.

