संशोधनातून उद्योजकतेकडे वाटचाल : एसकेएन सिंहगड महाविद्यालयात तंत्रज्ञान व्यावसायिकीकरणावर मार्गदर्शन*

 *संशोधनातून उद्योजकतेकडे वाटचाल : एसकेएन सिंहगड महाविद्यालयात तंत्रज्ञान व्यावसायिकीकरणावर मार्गदर्शन*



पंढरपूर, दि. २८ मार्च २०२६ :

एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथे इनोव्हेशन कौन्सिल (आयआयसी) अंतर्गत “तंत्रज्ञान व्यावसायिकीकरण, परवाना व हस्तांतरण पद्धती आणि धोरण” या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये संशोधनातून निर्माण होणाऱ्या कल्पनांचे व्यावसायिक उत्पादनांमध्ये रूपांतर कसे करावे, याबाबत जागरूकता निर्माण करणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकतेला चालना देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ श्री. राजेंद्र आर. शिंदे (संचालक, विक्ट्रिबेल एंटरप्रायझेस प्रा. लि.) उपस्थित होते. त्यांनी बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर), पेटंटचे व्यावसायिकीकरण, परवाना धोरणे, स्टार्टअप संकल्पना आणि तंत्रज्ञान हस्तांतरण या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून शैक्षणिक संशोधन आणि उद्योग क्षेत्र यामधील दरी कशी कमी करता येईल, हे त्यांनी प्रभावीपणे स्पष्ट केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश जे. करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधनाभिमुख दृष्टीकोन विकसित करून नवोपक्रमातून उद्योजकतेकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले.

उपप्राचार्य तसेच इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. स्वानंद जी. कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासोबतच संशोधन आणि स्टार्टअप क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. अतुल एस. आराध्ये व प्रा. के. पी. जाधव यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रमाची आखणी करून तो यशस्वीरीत्या पार पाडला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी तज्ज्ञांशी थेट संवाद साधत आपल्या शंकांचे निरसन केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला असून संशोधनाच्या व्यावसायिकीकरणासाठी प्रेरणादायी ठरला.

कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. अतुल आराध्ये यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad