*पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागामार्फत भाषण व बायोडाटा लेखन स्पर्धा उत्साहात संपन्न*
पंढरपूर : प्रतिनिधी
पंढरपूर येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागामार्फत ११ मार्च २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी भाषण व बायोडाटा लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये संवादकौशल्य, आत्मविश्वास तसेच व्यावसायिक कौशल्ये विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धा आणि बायोडाटा लेखन स्पर्धा अशा दोन उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाषण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भारतातील ऊर्जा परिस्थिती, जागतिक युद्ध परिस्थिती, कृत्रिम बुद्धिमत्ता - वरदान की अभिशाप ?, कृषी विकास व त्यासमोरील आव्हाने, उदयोन्मुख नवीन तंत्रज्ञान तसेच जागतिक अर्थव्यवस्थेवर शुल्क युद्धाचा परिणाम अशा विविध समकालीन विषयांवर आपले विचार प्रभावीपणे मांडले.
बायोडाटा लेखन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी करिअर उद्दिष्ट, शैक्षणिक माहिती, सहशैक्षणिक उपक्रम, इतर उपक्रम, वैयक्तिक माहिती, उल्लेखनीय कामगिरी व छंद तसेच प्रकल्प यांचा समावेश असलेले प्रभावी व व्यावसायिक स्वरूपाचे बायोडाटा तयार करून आपली कौशल्ये सादर केली. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना रोजगारासाठी आवश्यक असलेल्या प्रभावी बायोडाटा तयार करण्याच्या कौशल्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. एच. एस. देशपांडे यांच्या संयोजनाखाली करण्यात आले होते. तर कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन स्वप्नील मदाने आणि जान्हवी कासेगांवकर यांनी केले.
हा उपक्रम यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस. एस. कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी तसेच प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या संवाद कौशल्यात, विचार मांडण्याच्या क्षमतेत तसेच व्यावसायिक तयारीत वाढ झाली असून विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळत असल्याचे मत प्राध्यापकांनी व्यक्त केले.

