*एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात रोबोटिक्स कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
पंढरपूर | प्रतिनिधी
पंढरपूर येथील एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी येथे ई-यंत्रा क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेली रोबोटिक्स विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडली. दि. १७ व १८ मार्च २०२६ रोजी आयोजित या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून श्री. शशिकांत हिप्परगी यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी रोबोटिक्समधील मूलभूत संकल्पना, संवेदकांचा (सेन्सर) वापर, संगणकीय आज्ञावली (प्रोग्राम) तयार करणे तसेच यांत्रिक आणि सॉफ्टवेअर घटकांमधील समन्वय याविषयी सविस्तर माहिती दिली. यासोबतच रोबोटिक्सचे औद्योगिक, वैद्यकीय, कृषी व अवकाश क्षेत्रातील वाढते महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. स्वयंचलित यंत्रणा (ऑटोमेशन), कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्मार्ट यंत्रसामग्री यांमध्ये रोबोटिक्सची भूमिका कशी महत्त्वाची आहे, याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे विविध रोबोटिक नमुने तयार केले. लाईन फॉलोअर रोबोट, अडथळा ओळखणारे रोबोट (ऑब्स्टॅकल अवॉइडन्स) तसेच स्वयंचलित हालचाल करणाऱ्या यंत्रणांचे मॉडेल तयार करून त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. यामुळे विद्यार्थ्यांची तांत्रिक समज, समस्या सोडवण्याची क्षमता आणि नवकल्पना विकसित होण्यास मोठी मदत झाली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाविषयीची आवड अधिक दृढ झाली असून, रोबोटिक्स क्षेत्रातील कौशल्ये विकसित होण्यास चालना मिळाली. सहभागी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत आपल्या कल्पकता व सर्जनशीलतेचा उत्कृष्ट नमुना सादर केला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे तसेच उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली. या उपक्रमासाठी कर्मचारी समन्वयक म्हणून प्रा. यू. जी. फुले, प्रा. आर. जी. घोडके, प्रा. ए. डी. जाधव तसेच प्रा. एस. डी. घोडके यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच विद्यार्थी समन्वयक म्हणून प्रतीक कुलकर्णी व अनन रवी यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

