स्टार्टअप संस्कृतीला बळ : सिंहगड महाविद्यालयातील बूट कॅम्प ठरला यशस्वी*

 *स्टार्टअप संस्कृतीला बळ : सिंहगड महाविद्यालयातील बूट कॅम्प ठरला यशस्वी*



पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे “स्टार्टअप रेडीनेस बूट कॅम्प : आयडिया जनरेशन टू मार्केट लॉन्च” या दोन दिवसीय शिबिराचे आयोजन १३ व १४ मार्च रोजी करण्यात आले. हे शिबिर महाविद्यालय व पी. एम. उषा - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमात विविध महाविद्यालयांतील सुमारे २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

यावेळी प्रा. राष्ट्रपाल गाडे यांनी विद्यार्थ्यांना “बिझनेस मॉडेल अँड फिजिबिलिटी प्लॅनिंग” या विषयावर मार्गदर्शन केले. या सत्रामध्ये त्यांनी उद्योजकतेची संकल्पना स्पष्ट करत व्यवसाय कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आवश्यक नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास, खर्च-उत्पन्न विश्लेषण तसेच प्रकल्पाची व्यवहार्यता (फिजिबिलिटी) कशी तपासावी याबाबत सविस्तर माहिती दिली.

यानंतर श्री. अनासे सर यांनी ‘आयडिया लॅब’चा इतिहास आणि त्याचे उपयोग यावर प्रकाश टाकला. बदलत्या जगात इनोव्हेशनचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी ‘फॅब लॅब’ संकल्पनेची उदाहरणांसह माहिती दिली. चुकांमधून शिकणे, विविध उपकरणांचा अधिकाधिक वापर करणे, आयडिया लॅबमध्ये जास्त वेळ घालवणे आणि इंटरडिसिप्लिनरी प्रोजेक्ट्स तयार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळेच प्रभावी टीचिंग-लर्निंग इकोसिस्टीम निर्माण होऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

त्यानंतर श्री. चंद्रकांत लोंढे यांनी विद्यार्थ्यांना आयपीआर (बौद्धिक संपदा हक्क) आणि स्टार्टअप कॉम्प्लेक्स याविषयी मार्गदर्शन केले. नवउद्योजकांसाठी बौद्धिक संपदा हक्कांचे महत्त्व स्पष्ट करत त्यांनी व्यवसाय सुरू करताना आर्थिक नियोजन कसे करावे याची माहिती दिली. यामध्ये शेअर मार्केट, म्युच्युअल फंड गुंतवणूक, उत्पन्न कर भरण्याची प्रक्रिया, संबंधित नियम तसेच शासनाचे नियंत्रण आणि विविध योजना यांचा समावेश होता.

तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी, उद्योगांसाठी उपलब्ध शासकीय योजना, वयोमर्यादा आणि अनुदान याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. उद्योग क्षेत्रातील सर्व्हिस सेक्टर आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधील संधी व वैशिष्ट्येही विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.

व्यवसायाच्या विविध प्रकारांबद्दल माहिती देताना त्यांनी प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड, लिमिटेड कंपनी तसेच एनजीओ आणि को-ऑपरेटिव्ह संस्थांच्या माध्यमातून व्यवसाय कसा करता येतो याचे सविस्तर विवेचन केले. स्वतःचा उद्योग सुरू करताना मार्केट सर्व्हे करणे, बाजारपेठेचा अभ्यास आणि प्रत्यक्ष पाहणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी विशेषतः नमूद केले.

यानंतर विद्यार्थ्यांनी स्टार्टअपच्या दृष्टीने काही प्रकल्पांचे सादरीकरण केले. उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या सादरीकरणांचे मूल्यमापन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी तसेच कार्यक्रमाचे समन्वयक व इन्क्युबेशन मॅनेजर डॉ. अतुल आराध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील आयआयसी सेल, ईडीसी सेलचे सर्व शिक्षक व विद्यार्थी तसेच इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad