स्वेरीमध्ये 'एआय व्हिजन २६: प्रोजेक्ट डेमॉन्स्ट्रेशन एक्स्पो’ संपन्न


स्वेरीमध्ये 'एआय व्हिजन २६: प्रोजेक्ट डेमॉन्स्ट्रेशन एक्स्पो’ संपन्न



पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (ऑटोनॉमस) मध्ये इन्स्टिट्यूशनच्या इनोव्हेशन कौन्सिल (आयआयसी) अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग (इ अँड टीसी) या विभागाने आयोजित केलेला 'एआय व्हिजन २६: प्रोजेक्ट डेमॉन्स्ट्रेशन एक्स्पो' हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. 

        आत्मनिर्भर भारताच्या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत राहून हा कार्यक्रम 'एआय सप्ताहा'चा एक भाग म्हणून साजरा करण्यात आला. या प्रोजेक्ट डेमॉन्स्ट्रेशन एक्स्पोने विद्यार्थ्यांना ‘विज्ञान आणि एआय-सक्षम संशोधन आणि विकास’ या संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उपाय विकसित करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी स्वेरीचे माजी विद्यार्थी असलेले उद्योजक व स्पार्टन सोलर टेक्नॉलॉजीचे संस्थापक सूरज डोके हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सामाजिक उपयोगासाठी तंत्रज्ञान समजून घेण्यास आणि विकसित करण्यास कशी मदत करू शकते? या विषयावर कंपनीचे संस्थापक सूरज डोके हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की ‘विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना केवळ कोडिंगपुरते मर्यादित न राहता, वास्तविक जगातील सामाजिक समस्या सोडवणारे तंत्रज्ञान निर्माण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करावे. स्पर्धेच्या युगात नवनवीन संकल्पनांना दिशा दिल्यास त्यातून निर्माण होणारे प्रकल्प हे जनतेला अधिक सक्षम करतील. यातून देशाचा विकास अधिक गतीने होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी आपली निर्मिती देशाच्या हितासाठी करावी.’ असे सांगून आपल्या उद्योगाची माहिती देवून इतरत्र नोकरी करण्यापेक्षा आपला उद्योग व्यवसाय कसा वाढेल आणि त्यातून इतरांना रोजगार कसा देता येईल याकडे त्यांनी लक्ष वेधले. या कार्यक्रमात २० हून अधिक संघांनी उस्फूर्त सहभाग घेतला, यामध्ये इंजिनिअरींग, फार्मसी, डिप्लोमा आणि एमसीए शाखांमधील प्रतिभावान विद्यार्थी एकत्र आले होते. या कार्यक्रमामुळे उद्योग,नावीन्य आणि पायाभूत सुविधांना भविष्यात चालना मिळणार आहे. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना त्यांच्या संशोधन प्रकल्पासाठी रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार यांच्या सहकार्याने, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार व विभागप्रमुख डॉ. नीता तळवळकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागातील विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन स्वरा तासगावकर यांनी केले तर आभार प्रा. महुआ बिश्वास यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad